Swami Agnivesh Passes Away: आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन: Liver Cirrhosis ने होते ग्रस्त
शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. स्वामी अग्निवेश यांना सोमवारी नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस मध्ये दाखल करण्यात आले होते.
आर्य समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, नेते (Arya Samaj Leader) स्वामी अग्निवेश (Swami Agnivesh) यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. स्वामी अग्निवेश यांना सोमवारी नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस मध्ये दाखल करण्यात आले होते. स्वामी अग्निवेश यांच्या मृत्यूची पुष्टी करताना आयएलबीएस म्हणाले, 'स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु हे शक्य झाले नाही. सायंकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’
लिव्हर सिरोसिस (Liver Cirrhosis) ग्रस्त असलेल्या अग्निवेश यांच्या कित्येक प्रमुख अवयवांनी मंगळवारपासून कार्य करणे बंद केले होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून होती, परंतु त्यांचा बचाव होऊ शकला नाही. 21 सप्टेंबर, 1939 रोजी स्वामी अग्निवेश यांचा जन्म झाला. ते सामाजिक विषयांवर स्पष्ट बोलण्यांसाठी, स्वतःचे विचार परखडपणे मान्य करण्यासाठी परिचित होते. 1970 मध्ये आर्यसभा नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला होता.
त्यानंतर 1977 मध्ये ते हरियाणा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यांनी हरियाणा सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले.1981 मध्ये त्यांनी बंधू मुक्ती मोर्चा नावाची संस्था स्थापन केली. स्वामी अग्निवेश यांनी 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारविरोधी चळवळीतही भाग घेतला होता. मात्र नंतर मतभेदांमुळे त्यांनी या आंदोलनातून माघार घेतली. बिग बॉस या शोमध्येही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. (हेही वाचा: हिंदू देवी काली माता हिच्या विरोधात अपमाजनक पोस्ट, वीएचपी कडून ट्विटरच्या विरोधात दाखल केला गुन्हा)
बंधूआ मुक्ती मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि सार्वदेशिक आर्य प्रतिष्ठान सभेचे सचिव विठ्ठलराव आर्य म्हणाले, ‘स्वामी अग्निवेश यांचे पार्थिव शेवटच्या दर्शनासाठी जंतर-मंतर रोड येथे 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. आम्ही आमच्या सर्व मित्रांना विनंती करतो की कोविड-19 च्या नियमांचे पालन करून शेवटचा श्रद्धांजली अर्पण करा. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता अग्निलोक आश्रम, बहलपा, गुरुग्राम येथे त्यांचे अन्त्यसंस्कार होणार आहे.