Swadesh Store: रिलायन्स रिटेलने हैद्राबादमध्ये सुरु केले देशातील पहिले 'स्वदेश' स्टोअर; शिल्पकार आणि कारागीरांना मिळणार मोठी मदत (Watch)
भारतीय कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा या स्टोअर सुरू करण्यामागचा उद्देश आहे. यासोबतच ते कारागिरांसाठी उत्तम उत्पन्नाचे साधन ठरले पाहिजे याकडे लक्ष देण्यात आले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance) देशातील कारागीर आणि शिल्पकारांना मदत करण्यासाठी पहिले 'स्वदेश' स्टोअर (Swadesh Store) उघडले आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा, नीता अंबानी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे या स्टोअरचे उद्घाटन केले. या स्टोअरच्या माध्यमातून रिलायन्स देशाची जुनी कलाकुसर जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. रिलायन्सच्या या स्वदेशी स्टोअरमध्ये पारंपरिक कारागिरांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.
'स्वदेशी' स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी नीता अंबानी म्हणाल्या की, ‘स्वदेशी स्टोअरच्या माध्यमातून रिलायन्स भारतीय कला आणि हस्तकलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करत आहे. याद्वारे ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. या स्टोअरच्या मदतीने देशातील लाखो कारागिरांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल आणि या माध्यमातून त्यांना चांगल्या कमाईच्या संधी मिळतील.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘कारागिरी ही भारताची शान आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्ही याला जागतिक स्तरावर अधिकाधिक ओळख देण्याचा प्रयत्न करत आहोत.’ यासोबतच भारतीय कलाकुसरीला ओळख मिळवून देण्यासाठी या स्टोअरचा अमेरिका आणि युरोपमध्येही विस्तार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
हैदराबादमध्ये असलेले स्वदेशी स्टोअर एकूण 20 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. भारतीय कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा या स्टोअर सुरू करण्यामागचा उद्देश आहे. यासोबतच ते कारागिरांसाठी उत्तम उत्पन्नाचे साधन ठरले पाहिजे याकडे लक्ष देण्यात आले आहे. या स्टोअरमध्ये क्राफ्ट वस्तूंबरोबरच खाद्यपदार्थ आणि कपड्यांचे पर्याय उपलब्ध असतील. या दुकानात ठेवलेल्या वस्तूंवर स्कॅनरही बसवण्यात आला आहे. येथे ग्राहकांना 'स्कॅन अँड नो'ची सुविधा मिळते. म्हणजेच ग्राहक स्कॅनकरून उत्पादनाची माहिती प्राप्त करू शकता. (हेही वाचा: Wealth Inequality In India: भारतामध्ये वाढत आहे आर्थिक विषमता; 10% श्रीमंतांकडे देशाची अर्धी संपत्ती- UNDP Reports)
कारागीरांना मदत करण्यासाठी, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, NMACC, मुंबई येथे एक विशेष स्वदेशी झोन तयार करण्यात आला आहे. या झोनमध्ये भारतीय हस्तकलेशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत, ज्या कोणीही खरेदी करू शकतो. या झोनमध्ये विकल्या जाणाऱ्या मालाचा संपूर्ण पैसा कारागिरांकडे जातो. अशा परिस्थितीत हा स्वदेशी झोनचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनतर्फे स्वतंत्र स्वदेशी स्टोअर सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, रिलायन्स फाऊंडेशन लवकरच देशात एक आर्टिसन इनिशिएटिव्ह फॉर स्किल एन्हांसमेंट (RAISE) केंद्र स्थापन करणार आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण 18 केंद्रे असतील ज्याद्वारे देशातील 600 हून अधिक कारागिरांना जोडण्याची योजना आहे.