अंधश्रद्धेचा कळस! तामिळनाडूच्या मंदिरात बसवली 'कोरोना देवी'ची मूर्ती; सकाळ-संध्याकाळ होत आहे विधिवत पूजा (Watch Video)
या मंदिरामध्ये कोरोना देवीची 48 दिवस विशेष पूजा ठेवली आहे. त्याचवेळी महायज्ञ आयोजित केला जाईल, ज्या दरम्यान लोकांना मंदिरात पूजा करण्यास परवानगी दिली जाणार नाही
कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या दुसर्या लाटेनंतर आता सर्वजणच भयभीत झाले आहेत. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशात अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा विनाश टळावा म्हणून लोक पूजा-अर्चना करत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कोयंबटूर (Coimbatore) येथून समोर आली आहे. येथील प्रसिद्ध मंदिरात, लोकांनी कोरोना देवीची मूर्ती बसवली आहे. अगदी न चुकता सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा केली जात आहे. हे मंदिर तामिळनाडूच्या कोयंबटूरमधील कामाचीपुरी अध्यायचे एक मंदिर आहे.
कोरोना व्हायरस संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या प्राणघातक विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र ते राज्य सरकारांपर्यंत सर्वजण प्रयत्न करत आहेत. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सामाजिक अंतर, मास्किंग आणि कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र अजूनही कुठे गोमुत्राचे सेवन केले जात आहे तर कुठे शेणाने अंघोळ केली जात आहे. आता कोयंबटूरमध्ये तर चक्क कोरोना देवीची मूर्ती बसवली आहे व पुजारी रोज तिची पूजा करीत आहेत.
ही मूर्ती ग्रॅनाइटपासून बनविली गेली आहे. या मंदिरामध्ये कोरोना देवीची 48 दिवस विशेष पूजा ठेवली आहे. त्याचवेळी महायज्ञ आयोजित केला जाईल, ज्या दरम्यान लोकांना मंदिरात पूजा करण्यास परवानगी दिली जाणार नाही. असे म्हणतात की या मंदिरात आपत्तीपासून वाचण्यासाठी देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याची परंपरा चालू आहे. उदाहरणार्थ, तमिळनाडूत कोयंबटूरमधील प्लेग मरिअम्मन मंदिर अशी देवता आहेत. (हेही वाचा: काय सांगता? Covid-19 ला देवी समजून महिला करत आहेत 'कोरोना माई'ची पूजा; श्रद्धाळूंचा 21 दिवस पूजेचा संकल्प)
दरम्यान, वाराणसीच्या जैन घाटावर कोरोना विषाणूला देवी मानून महिला सकाळ संध्याकाळ तिची पूजा करताना दिसत आहेत. त्यांचा विश्वास आहे की अशा पूजेने ही देवी लवकरच लोकांना या आजारातून मुक्त करेल. या महिलांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची 21 दिवस पूजा करण्याचा संकल्प सोडला आहे.