उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील विषारी दारुने झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकऱ्या द्या- प्रियंका गांधी

विषारी दारु 100 लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी काँग्रेस जनरल सेक्रेटरी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Priyanka Gandhi & Rahul Gandhi | (Photo Credit: PTI)

विषारी दारुमुळे 100 लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी काँग्रेस जनरल सेक्रेटरी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) मधील भाजप (BJP) सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने दोषींविरोधात कठोर कारवाई करावी आणि पीडितांप्रती सहानुभूती दर्शवावी, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

विषारी दारुमुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील 100 लोकांचा मृत्यू होणे ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बाब असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. तसंच इतक्या मोठ्या प्रमाणात विषारी दारुची निर्मिती होणे आणि राज्यभरात तिची विक्री होणे, हे देखील संतापजनक आहे. युपी-उत्तरखंड मध्ये विषारी दारुचे थैमान, मृतांचा आकडा 92 वर पोहचला

या प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना सरकारी नोकऱ्या देण्यात याव्यात. या प्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करत पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि सरकारी नोकऱ्या देण्यात याव्यात, अशी आशा प्रियंका गांधींनी व्यक्त केली आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील लोकांनी विषारी दारुमुळे झालेल्या या प्रकरणाचा निषेध करत रस्ता रोको आंदोलन केले होते. पीडितांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या, त्यांच्या बायकांना नोकऱ्या द्या आणि दोषींना कठोर शिक्षा द्या, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अवैध दारु बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या 130 जणांना अटक केली आहे. काही राजकीय पक्ष विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 100 असल्याचे बोलत असले तरी खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात एकूण 43 तर उत्तराखंडात 32 बळी गेले आहेत.