Snake in Mid Day Meal: मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात आढळला 'साप'; 30 हून अधिक मुले रुग्णालयात दाखल
हा मुलगाही धोक्याबाहेर आहे.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात (Mid-Day Meal) मृत साप आढळून आला आहे. या अन्नामुळे 30 हून अधिक मुले आजारी पडली आहेत. या जेवणाचे सेवन केल्यानंतर मुलांना अचानक उलट्या होऊ लागल्या. यानंतर त्यांना रामपुरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डाळीने भरलेल्या डब्यात साप सापडल्याचा दावा अन्न तयार करणाऱ्या एका शाळेतील कर्मचाऱ्याने केला.
गटविकास अधिकारी दीपांजन जाना यांनी सांगितले की, अनेक गावकऱ्यांकडून माध्यान्ह भोजन घेतल्यानंतर आजारी पडण्याच्या तक्रारी आल्या होत्या. 10 जानेवारीला प्राथमिक शाळांच्या जिल्हा निरीक्षकांना त्यांनी ही माहिती दिली. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: अंगणात झोपलेल्या मुलाला माकडाने नेले उचलून, छतावरून खाली फेकल्याने निष्पाप बाळाचा दुर्देवी मृत्यू)
अधिकाऱ्याने सांगितले की, हे जेवण घेतल्यानंतर अनेक मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व आता एक मूल वगळता सर्व मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हा मुलगाही धोक्याबाहेर आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटना उघडकीस आल्यानंतर पालकांनी शाळेला घेराव घातला होता. त्यांनी मुख्याध्यापकांच्या गाडीची तोडफोड केली. मात्र, नंतर प्रकरण शांत झाले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने माध्यान्ह भोजनात मांस आणि अंडी समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने फळे आणि कोंबडीचे मांस देण्यासाठी 372 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता या सगळ्यात साप अन्नात सापडल्याच्या घटनेने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान याआधी बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील लालगंज अततुल्लापूर येथील एका माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजनात अळी सापडल्याची घटना समोर आली होती. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापक मोहम्मद मिसवद्दीन यांना दिली असता त्यांनी त्यावर, यामध्ये जीवनसत्त्वे असतात, ते चुपचाप खा असे सांगितले होते.