हैदराबादमध्ये सहा लाख लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची भीती; सांडपाण्यात आढळले विषाणू, CCMB च्या अभ्यासात खुलासा
शहरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असताना सीसीएमबीने (CCMB) हैद्राबादबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
एकीकडे तेलंगणात कोरोना विषाणू (Coronavirus) थांबायचे नाव घेत नाही, आता हैदराबाद (Hyderabad) शहरातील लोकांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. शहरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असताना सीसीएमबीने (CCMB) हैद्राबादबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सीसीएमबीच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू केवळ नाक आणि तोंडातूनच पसरू शकत नाही, तर सांडपाण्याद्वारेही लोकांमध्ये पसरू शकतो. मात्र, सीसीएमबीचे असेही म्हणणे आहे की, जरी हा विषाणू सांडपाण्याद्वारे पसरला तरी त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. हैद्राबादमध्ये किमान सहा लाख असे लोक असू शकतात ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, परंतु त्यातील बहुतेकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही.
संभाव्य संक्रमित व्यक्तींच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी संयुक्त प्रयत्नांचा एक भाग म्हणून सीसीएमबी आणि आयआयसीटीने विविध सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) मधून सांडपाण्याचे नमुने गोळा केले. सीसीएमबीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हैदराबादच्या 80 टक्के एसटीपीवर केलेल्या या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सुमारे दोन लाख लोक व्हायरस संबंधित सामग्रीचे उत्सर्जन करीत आहेत. सीसीएमबीने सांगितले की केवळ 40 टक्के सांडपाणी एसटीपीपर्यंत पोहोचले आहे, यावरून आता जवळजवळ सहा लाख लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे संकेत आहे.
मेड रेक्सिव्हने केलेल्या सर्वेक्षणात या संशोधनाचे अहवाल नोंदविण्यात आले आहेत. या संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, याती बहुतेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते व अनेकदा हे रुग्ण स्वतःचा ठीक होतात. दरम्यान, गुरुवारी तेलंगणामध्ये कोरोनाची 1,967 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यासह राज्यात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 99,391 झाली आहे. राज्यातील कोरोना रुगांच्या मृत्यूंची संख्या 737 झाली आहे.