धक्कादायक! बंगळूरूच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग, तर दुसऱ्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा दाखल

याआधी अनेकवेळा या क्वारंटाईन सेंटर्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले होते, मात्र आता बेंगळूरूच्या (Bengaluru) क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क बलात्काराचा (Rape) प्रयत्न घडला आहे.

प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरस (Coronoavirus) आजाराचा सामना करण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स (Quarantine Centre) उभे केले आहेत. याआधी अनेकवेळा या क्वारंटाईन सेंटर्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले होते, मात्र आता बेंगळूरूच्या (Bengaluru) क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क बलात्काराचा (Rape) प्रयत्न घडला आहे. एका महिलेचा विनयभंग करून लगेच दुसऱ्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न एक व्यक्तीने केला आहे. बंगळूरूच्या एचएसआर लेआउट (HSR Layout) क्वारंटाईनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जयशंकर, वय 30 असे या व्यक्तीने नाव असून, आरोपीविरूद्ध लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेंगळूरू मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी मुंबईहून बेंगळूरूला गेलेल्या प्रवाशांना एचएसआर लेआउट येथे क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. सकाळी यातील एक महिला बाथरूमकडे गेली असता, तिथे आधीच उभा असलेल्या एका व्यक्तीने या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही महिला कशीबशी तिथून पळून आपल्या खोलीत आली, मात्र हा तरुण तिचा पाठलाग करत तिच्या खोलीत घुसला. तिथे त्याने या महिलेच्या 22 वर्षीय रूममेटला ओढून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. रुममध्ये अजून काही महिला होत्या, त्यांना या व्यक्तीला हटवायचा प्रयत्न केला मात्र ते शक्य न झाल्याने त्यांनी अलार्म वाजवला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले व आता पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा: मध्य रेल्वेने मुंबई लोकल चालविणा-या मोटरवुमनचा फोटो शेअर करून प्रवाशांना दिला महत्त्वाचा संदेश)

सध्या या क्वारंटाईन सेंटरमध्ये 54 पुरुष व 6 स्त्रिया आहेत. पुरुष व स्त्रियांसाठी मिळून कॉमन बाथरूमची सोय या ठिकाणी आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी आरोपी जयशंकर याच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्याविरुध्द आयपीसी कलम 354-A आणि  354-B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या व्यक्तीची कोविड-19 चाचणीसह वैद्यकीय चाचणी करत आहेत. त्यानंतर तपास सुरु होईल.