धक्कादायक! बिहार येथे लग्नासाठी जमलेल्या 300 पैकी 95 जणांना कोरोना व्हायरसची लागण; लग्नानंतर दोनच दिवसात नवऱ्याचा मृत्यू
आता लॉक डाऊन (Lockdown) मध्ये जरी शिथिलता आणली असली तरी, संक्रमित रुग्णांच्या संख्येत काहीच फरक पडला नाही.
देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता लॉक डाऊन (Lockdown) मध्ये जरी शिथिलता आणली असली तरी, संक्रमित रुग्णांच्या संख्येत काहीच फरक पडला नाही. अशात शासनाने सामाजिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. लग्नासारख्या सोहळ्यामध्ये (Wedding) 50 लोक सहभागी होऊ शकतात. मात्र आता बिहार (Bihar) राज्यातून एक धक्कादायक बाब समोर येत आहे, जिथे एका लग्नात सामील झालेल्या 95 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. महत्वाचे म्हणजे नवऱ्या मुलाचा लग्नाच्या दोन दिवसांनतरच मृत्यू झाला आहे. मात्र त्याच्या पार्थिवाची कोरोना चाचणी घेण्याआधीच कुटुंबीयांनी त्याचे अंत्यसंस्कार केले.
बिहार च्या पटना (Patna) जिल्ह्यातील पालीगंजच्या नौबातपूर गावात 15 जून रोजी हे लग्न झाले होते. नवरा मुलगा गुरुग्राम येथे सॉफ्टवेअर इंजीनिअर होता, ज्याचा 17 जून रोजी मृत्यू झाला. या घटनेची पुष्टी करताना पटनाचे डीएम कुमार रवी म्हणाले की, लग्नानंतर वराच्या मृत्यूबद्दल एक निनावी फोन आला होता व त्यानंतर आमची तपासणी सुरु झाली. मुलगा असिम्प्टेमॅटीक होता मात्र तरीही घराच्या लोकांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला. प्रशासनाने वराच्या जवळच्या नातलगांचे आणि त्याच्या शेजार्यांचे नमुने गोळा केले आणि त्यानंर 15 जणांची कोरोनाची सकारात्मक चाचणी आली. त्यानंतर लग्नाला आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि सोमवारी 80 जणांची सकारात्मक चाचणी आली. (हेही वाचा: Palghar: कोरोना व्हायरस चाचणीचा निकाल येण्याआधीच उरकले लग्न; तीन दिवसांनंतर नवरा मुलगा आढळला कोरोना संक्रमित, गुन्हा दाखल)
लग्नाच्या वेळी नवऱ्याची तब्येत अतिशय नाजूक होती. या दरम्यान तो इतका अशक्त होता की वरातीमध्ये तो चक्क खाली कोसळला होता, तरी हे लग्न पार पाडण्यात आले. सुदैवाने नवऱ्या मुलीची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. सध्या प्रशासनाने या लग्नाशी संबंधील भाजी विक्रेते तसेच इतर अशा 300 लोकांचे नमुने गोळा केले आहे, त्यापैकी आज 80 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आहे. व आता या 80 लोकांच्या संपर्कांची यादी तयार केली जात आहे.