Shocking! 11 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; आरोपी फरार, बलात्काराचा गुन्हा दाखल
जन्मलेल्या मुलीचा वडील हा पीडितेचा जवळचा नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. या मुलीचे कुटुंब तिचे लग्न या मुलाशी लावून देणार होते
राजस्थानमधील (Rajasthan) डुंगरपूर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला, त्यानंतर उदयपूरमधील खेरवारा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ऋषभदेव (उदयपूर) मंडळ अधिकारी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या आठवड्यात गुरुवारी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. माहितीवरून, आम्ही कुटुंबाशी संपर्क साधला, त्यानंतर तिच्या वडिलांनी रविवारी एका तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.’
खेरवाडा भागातील एका अकरा वर्षीय मुलीला प्रसूतीवेदना सुरु झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला डुंगरपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे तिने 4 डिसेंबरला मुलीला जन्म दिला. रुग्णालय व्यवस्थापनाने याची माहिती डुंगरपूर पोलिसांना दिली. मंगळवारी रात्री उशिरा खेरवारा पोलीस ठाण्याला याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक डुंगरपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. खेरवाडा पोलीस ठाण्यात बाळाला जन्म देणाऱ्या मुलीचा जबाब नोंदवला.
पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबांबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. जन्मलेल्या मुलीचा वडील हा पीडितेचा जवळचा नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. या मुलीचे कुटुंब तिचे लग्न या मुलाशी लावून देणार होते, त्यामुळे घडलेल्या प्रकाराची माहिती असूनही त्यांनी मौन बाळगले. बुधवारी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कागदर-कानुवाडा गावातील पिंटू मुलगा रमेश अहारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पिंटू हा गुजरातमध्ये मजुरीचे काम करत असे. नातेवाईक असल्याने तो पीडितेच्या घरी येत-जात असे. दरम्यान, त्याने पीडितेला फूस लावून तिच्यावर बलात्कार केला, त्यामुळे ती गर्भवती राहिली. मुलीच्या गरोदरपणाची माहिती तिच्या नातेवाईकांना होती मात्र त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही आणि प्रकरण लपवून ठेवले.