IPL Auction 2025 Live

हजेरीदरम्यान 'येस सर' नाही 'जय हिंद' म्हणा; नववर्षापासून गुजरात सरकारचा शालेय विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी गुजरात शिक्षण मंडळाने नववर्षापासून नवीन नियम लागू केला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी गुजरात (Gujarat) शिक्षण मंडळाने नववर्षापासून नवीन नियम लागू केला आहे. हजेरीदरम्यान 'येस सर' (Yes Sir) किंवा 'प्रेसेंट सर' (Present Sir) ऐवजी 'जय हिंद' (Jai Hind) किंवा 'जय भारत' (Jai Bharat) बोलण्याचा नवा नियम गुजरातमधील सर्व शाळांमध्ये 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यात आला आहे. हा नवा नियम इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी पाळावा, असे प्राथमिक शिक्षण व गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ संचालनालय जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

या संदर्भातील नोटीस गुजरात सरकारने सोमवारी जारी केली. या नोटीसनुसार, राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांध्ये शिकणाऱ्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होतो. या नव्या नियमाचा निर्णय गुजरातचे शिक्षणमंत्री भुपेन्द्रसिंह चुदासमा (Bhupendrasinh Chudasama) यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला.

या नोटीसनुसार, राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा नियम 1 जानेवारी, 2019 पासून लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने हजेरीदरम्यान 'जय हिंद' बोलण्याचा नियम शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू केला होता. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि देशाभिमान जागृत करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.