Salman Khan Black Buck Case: सलमान खान विरुद्ध काळवीट शिकार प्रकरणी आज जोधपूर कोर्टात सुनावणी
मागील वेळेस या खटल्याच्या सुनावणीस सलमान उपस्थित नसल्याने कोर्टाने त्याला 27 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचा अल्टिमेटम दिला होता.
आज, 27 सप्टेंबर रोजी सलमान खान (Salman Khan) याच्या विरुद्ध जोधपूर कोर्टात (Jodhpur Court) काळवीट शिकार (Black Buck Case) व अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली सुनावणी होणार आहे. मागील वेळेस या खटल्याच्या सुनावणीस सलमान उपस्थित नसल्याने कोर्टाने त्याला 27 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचा अल्टिमेटम दिला होता.माध्यमांच्या माहितीनुसार, जर का सलमान आजच्या कारवाईसाठी उपस्थित राहिला नाही तर त्याला देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात येणार आहे परिणामी सलमान च्या विरोधात पुन्हा एकदा अटक वॉरंट काढण्यात येऊ शकते. न्यायाधीश चंद्र कुमार सोनगरा (Chandra Kumar Songara) यांच्या अध्यक्षेतेखाली आजची सुनावणी पार पडणार आहे.
मध्यंतरी या प्रकरणी सलमान खान याला बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. तू कायद्याच्या कचाट्यातून सुटलास तरी बिष्णोई समाजाच्या कायद्यातून सुटणार नाहीस अशा आशयाचे ताकीद देत काही संदेश सोशल मीडियावरून सलमान ला पाठवण्यात आले होते.
ANI ट्विट
प्राप्त माहितीनुसार, 12 ऑक्टोबर 1998 रोजी सलमानला या प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती, ज्यांनंतर ऑन कॅमेरा प्रक्रियेत कारवाई व साक्षीदारांचे पुरावे घेण्यात आले होते. यानंतर जोधपूर कोर्टाने 5 एप्रिल 2018 रोजी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर सलमानच्या वकीलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 7 एप्रिल रोजी सलमान खान याला 25 हजार रुपये दंड भरल्यानंतर जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, हा खटला आता तब्बल 21 वर्ष जुना आहे, त्यामुळे सलमान ला जरी शिक्षा झाली तरी वन्यजीव कायद्यानुसार सहा वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
1998 मध्ये 'हम साथ साथ है' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जोधपूर येथे काळवीटची शिकार आणि शस्त्र बाळगल्याने सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू आणि नीलम या कलाकारांची नावे सुद्धा समोर आली होती, मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष घोषित केले. तर सलमानला शस्त्र परवाना कोर्टात करण्याचे आदेश देण्यात आले, यावेळेस सलमानने परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले. मात्र कालांतराने सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याचे समोर आले. यातून सलमानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी 2006 मध्ये करण्यात आली होती मात्र या प्रकरणी कोर्टाने त्याला दिलासा दिला होता.