दिल्लीत कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला हे सरकारचे अपयश, आता कुणाचा राजीनामा घेणार? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल

दिल्लीत शेतकरी आंंदोलन, हिंसाचारानंतर संजय राऊत यांनी विचारला केंद्र सरकारला खडा सवाल, म्हणाले सरकार या दिवासाचीच वाट पाहत होते का?

Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

दिल्लीत सिंधू बॉर्डरवर मागील 62 दिवसांपासून शांतपणे आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांचा आज आक्रमक अंदाज पहायला मिळाला. शेतकर्‍यांच्या आजच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसक आंदोलन पहायला मिळालं आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष पेटलेला बघायला मिळाला त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये तणावाची परिस्थिती आहे. यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. 'राजीनामा तो बनता है साहेब' असं म्हणत त्यांनी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या.कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, ऊध्दव ठाकरे,शरद पवार की ज्यो बाईडनचा? असा खोचक सवाल त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून विचारला आहे. Kisan Tractor Rally: दिल्लीत आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर पोहचून रोवला आपला झेंडा!

संजय राऊत यांचे ट्वीट

दरम्यान संजय राऊत यांनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर सरकार काय याच दिवसाची वाट पाहत होते का? आपली लोकशाही नेमकी कुठे जातेय? शेतकर्‍यांचं सरकारने का काहीच ऐकलं नाही? ही लोकशाही नव्हे हे वेगळंच काहीतरी सुरू असल्याचं ट्वीट करत त्यांनी सरकारला सुनावलं आहे.

दिल्लीतील हिंसा रोखणं शक्य होतं. कुणीच हिंसेचं समर्थन करत नाही. लाल किल्ल्याचा आणि तिरंग्याचा अपमान कधीच केला जाऊ नये. पण परिस्थिती का बिघडली याचा देखील विचार केला जावा असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

आज सकाळी प्रस्तावित वेळेच्या आधीच आणि परवानगी नसलेल्या मार्गावरून आंदोलक शेतकरी दिल्लीमध्ये आले. रस्त्यामध्ये त्यांनी बॅरिकेटिंग तोडत, काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करत, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत तर काही ठिकाणी बस गाड्यांचे नुकसान करत लाल किल्ला गाठला. तेथे आपला झेंडा फडकावला. त्यामुळे सध्या दिल्लीत तणावाचं चित्र निर्माण झालं आहे.