Rupee To Replace Dollar In 18 Countries: जागतिक बाजारात रुपया ठरणार डॉलरला पर्याय, 18 देशांची मान्यता; पाहा यादी
डॉलरला पर्याय (De-Dollarise Global Trade) म्हणून भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करण्यासाठी जगभरातील 18 देशांनी नुकतीच मान्यता दिली आहे. डॉलर (Dollar) ऐवजी INR म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करण्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे.
INR Will Become International Currency: आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया (Indian Rupee)आगामी काळात डॉलरलाही पर्याय ठरणार आहे. डॉलरला पर्याय (De-Dollarise Global Trade) म्हणून भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करण्यासाठी जगभरातील 18 देशांनी नुकतीच मान्यता दिली आहे. डॉलर (Dollar) ऐवजी INR म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करण्यात अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे. भारताची केंद्रीय बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रशिया (Russia) आणि श्रीलंका (Sri Lanka) या देशांसह सुमारे 18 देशांमध्ये 60 खास रुपयांमध्ये व्होस्ट्रो खाती उघडण्यास मान्यताही दिली आहे.
भारताचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेमध्ये माहिती देताना सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने देशी आणि विदेशी अधिकृत डिलर (Authorised Dealer) बँकांना SRVAs उघडण्यास मान्यता दिली आहे. ही मान्यता 60 विशिष्ट प्रकरणांमध्ये दिली आहे. ज्यामुळे जगभरातील सुमारे 18 देश आता भारतीय रुपयांमध्ये पैशांची देवाणघेवाण करतील. दरम्यान, असे व्याप्त प्रमाणात घडले तर भारतीय रुपया लवकर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून ओळखले जाईल, असे बोलले जात आहे. (हेही वाचा, Digital Currency: भारताला मिळणार डिजिटल चलन, रिझर्व्ह बँक आज करणार सादर; नेमका कोणाला होणार फायदा?)
डॉलरच्या तुलनेत इतर चलनात व्यापार करण्यासाठी रशिया या एक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाने प्रतिसाद दिला आहे, असे सांगतानाच भागवत कराड पुढे म्हणाले की, भारत निर्यातीला चालना देण्यासाठी स्थानिक चलनात व्यापार करण्यास प्राधान्य देत आहे.
भारतीय रुपयांत व्यवहार करण्यास मान्यता दिलेल्या देशांची यादी
1 - रशिया, 2 - सिंगापूर, 3 – श्रीलंका, 4 - बोत्सवाना, 5 – फिजी, 6 - जर्मनी, 7 - गयाना, 8 - इस्रायल, 9 - केनिया, 10 - मलेशिया, 11 - मॉरिशस, 12 - म्यानमार, 13 - न्यूझीलंड, 14 - ओमान, 15 - सेशेल्स, 16 – टांझानिया, 17 - युगांडा, 18 - युनायटेड किंगडम.
उल्लेखनीय असे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेन विरुद्ध "विशेष लष्करी ऑपरेशन" लाँच केल्यानंतर पश्चिम आणि युरोपीय राष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादले. त्यानंतर भारत इतर देशांसोबत व्यापार समझोता करण्यासाठी INR चा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे.