Reliance AGM 2023:रिलायन्स बोर्डावर ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची वर्णी; Nita Ambani पायउतार
त्यांच्या जागी आता नॉन एक्झिक्यूटीवर डायरेक्टर्स ( Non-Executive Directors ) म्हणून ईशा अंबानी (Isha Ambani), आकाश अंबानी (Akash Ambani) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांची निवड करण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड संचालक मंडळातून नीता अंबानी (Nita Ambani) पायउतार झाल्या आहेत. त्यांच्या जागी आता नॉन एक्झिक्यूटीवर डायरेक्टर्स ( Non-Executive Directors ) म्हणून ईशा अंबानी (Isha Ambani), आकाश अंबानी (Akash Ambani) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांची निवड करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्री लिमीटेड अर्थात (Reliance Industries Limited) अर्थात आरआयएल (RIL) ची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 2023 सोमवार, म्हणजेच 28 ऑगस्ट 2023 रोजी पार पडली. या सभेत RIL च्या संचालक मंडळाने, मानव संसाधन, नामांकन आणि पारिश्रमिक समितीच्या सल्ल्यानुसार कार्य करत नीता यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. तसेच, नव्या नियुक्तीबद्दल भागधारकांना माहिती देण्यात आली. भागधारकांनी त्यांच्या नियुक्तीला अधिकृत मान्यता दिल्याने त्यांचा कारभार सुरु होणार आहे.
रिलायन्सने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रिलायन्स फाऊंडेशनला भारतासाठी आणखी मोठा प्रभाव पाडण्यासाठी मार्गदर्शन आणि सक्षम करण्यासाठी नीता अंबानी यांच्या निर्णयाचा आदर करत संचालक मंडळानेही नीता अंबानी यांचा बोर्डाचा राजीनामा स्वीकारला आहे. अबांनी कुटुंबाचे तिन्ही वंशज हे पाठमागील काही वर्षांपासून रिलायन्सच्या रिटेल, डिजिटल सेवा, उर्जा आणि साहित्यासह इतर व्यवसायांमध्येही गुंतले आहेत. यातील काही व्यवसायांचे ते नेतृत्व करत आहेत. ते रिलायन्सच्या प्रमुख उपकंपन्यांच्या बोर्डवर देखील काम करतात.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, संचालक मंडळाने नीता अंबानी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. परंतु त्या कायमस्वरूपी निमंत्रित म्हणून बोर्डाच्या सर्व बैठकांना उपस्थित राहतील. जेणेकरून कंपनीला त्यांच्या सल्ल्याचा फायदा मिळू शकेल. रिलायन्स फाऊंडेशनला आणखी विस्तारीत काम करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळेल.
दरम्यान, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आजच्या सभेत केलेले भाषण महत्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी सभेत बोलताना म्हटले की, भारत सन 2047 पर्यंत पूर्णपणे विकसीत राष्ट्र असेल. त्यामध्ये रिलायन्स समूहाचा मोठा वाटा असेल. म्हणूनच नवीन रिलायन्स उदयोन्मुख नवीन भारताचा अग्रदूत आहे. त्यासाठी आम्ही अशक्य वाटणारी उद्दिष्टे निश्चित केली आणि ती साध्यही केली आहेत.