'रॅलीमधील खुर्च्या रिकाम्या असल्याचे समजल्याने PM Narendra Modi मागे फिरले, सुरक्षेमधील चुक हे फक्त निमित्त'- Congress
शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत होते त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला, याचा अर्थ काँग्रेसने काही केले असे नाही. काँग्रेसवरील आरोप निराधार आहेत.’
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान, भटिंडा विमानतळ ते फिरोजपूर मार्गावर शेतकरी आंदोलन करत होते, त्यामुळे पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. अखेर नाईलाजाने मोदींना परत फिरावे लागले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मोदी पुन्हा भटिंडा विमानतळावर परतल्यावर तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले, 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांगा की मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत येऊ शकलो.' याबाबत केंद्राने राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. घडल्या प्रकाराबद्दल कॉंग्रेसवर टीका होत असताना, आता कॉंग्रेसने याचा पलटवार केला आहे.
पंजाब सरकारमधील मंत्री राज कुमार वेरका म्हणाले की, ‘फक्त पंजाबच नाही तर संपूर्ण देशाला माहित आहे की शेतकरी भाजपच्या विरोधात आहेत. शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत होते त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला, याचा अर्थ काँग्रेसने काही केले असे नाही. काँग्रेसवरील आरोप निराधार आहेत.’ वेराका पुढे म्हणाले, ‘प्रत्यक्षात भाजपच्या रॅलीत लोक जमले नाहीत आणि पंतप्रधानांना फ्लॉप शोमध्ये जावेसे वाटले नाही. सभेतील खुर्च्या रिकाम्या असल्याचे समजल्याने पीएम मोदी मागे फिरले आणि त्यांनी पंजाब सरकारवर दोषारोप केला.’
तब्बल दोन वर्षानंतर मोदी आज पंजाबमध्ये पोहोचले होते. वादग्रस्त कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच राज्य दौरा होता. राष्ट्रीय शहीद स्मारकास भेट देण्यासाठी पंतप्रधान भटिंडा येथे पोहोचले होते. पुढे त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यात येणार होते. मात्र, पाऊस आणि खराब हवामानामुळे रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. परंतु रस्त्यावरील आंदोलनामुळे ते 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडले व अखेर माघारी फिरले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक असल्याचे केंद्राने म्हटले आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi Convoy Stuck on Flyover: फ्लायओव्हरवर अडकले पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा यंत्रणेकडून चूक; पंजाबमधील रॅलीही रद्द)
होत असलेल्या आरोपांवर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी, पंतप्रधानांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या, गर्दी नव्हती, त्यामुळे त्यांना सभा घेता आली नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे. रॅलीतील 90 टक्के जागा रिकाम्या असल्याचा दावा श्रीनिवास यांनी केला. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही सुरक्षेतील त्रुटी फेटाळून लावत पंतप्रधानांनी रस्त्याने प्रवास करण्याची योजना शेवटच्या क्षणी तयार केल्याचे सांगितले.