दिल्ली: भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमळ' आता पासपोर्टवर उमलणार'; विरोधकांच्या टीकेवर परराष्ट्र मंत्रालयाने केला खुलासा

केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले. यानंतर थेट संसदेत हा मुद्दा गाजला.

(Image: PTI/Representational)

जगभरात कुठेही प्रवास करण्यासाठी भारतीय असल्याची ओळख मानले जाणा-या पासपोर्टबाबतीत एक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता भारतीय पासपोर्टवर (Passport) कमळाचे (Lotus) चिन्ह दिसणार आहे. केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले. यानंतर थेट संसदेत हा मुद्दा गाजला. भाजपचे निवडणुक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आल्यामुळं विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधांची आक्रमकता पाहून लगेच परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं याबाबत खुलासा केला आहे.

पासपोर्ट हा प्रत्येक देशाच्या नागरिकत्वाची खरी ओळख असते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही जगभरात कुठेही फिरायचे असेल तर पासपोर्ट असणे बंधनकारक असते. तसे प्रत्येक देशाचे पासपोर्ट वेगवेगळे आहेत. भारतीय पासपोर्टवर सत्यमेव जयते असे लिहिले असून राजमुद्राचे चिन्ह आहे. त्यात आता कमळाचे चिन्ह देखील येणार आहे. या निर्णयामुळे विरोधकांकडून जोरदार टीका होत असून या निर्णयाला विरोध केला.

ANI चे ट्विट:

या निर्णयावर स्पष्टीकरण देत कमळ हे राष्ट्रीय फुल असून हे देशाचे प्रतिक असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्थव हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले.

केरळमध्ये या पासपोर्टचे वाटप करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत हा मुद्दा लावून धरला. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये याबाबत माहिती दिल्याचे सांगत, सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातला आहे, अशी टीकाही केली.