Ram Temple Construction: 60 वर्षांपासून गुहेत राहणाऱ्या बाबांनी राम मंदिरासाठी दिले 1 कोटी रुपये; दान-दक्षिणेवर होत आहे गुजराण
स्वामी शंकर दास जी यांनी मंदिरासाठी 1 कोटी मदत देण्याचे ठरविले व त्या रकमेचा चेक घेऊन ते ऋषिकेशच्या भारतीय स्टेट बँकेत गेले. बँक कर्मचाऱ्यांनी जेव्हा 1 कोटीचा धनादेश पहिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले
रामनागरी अयोध्येत (Ayodhya) श्री राम मंदिर (Ram Mandir) बांधण्याबाबत भाविकांचा उत्साह वाढला आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे भक्त आपापल्या परीने सहकार्य, दान करीत आहेत. आता ऋषिकेश (Rishikesh) नीलकंठ पादचारी मार्गावर एका गुहेत राहणाऱ्या एका साधूने समर्पण निधी म्हणून श्री राम मंदिर ट्रस्टला एक कोटी रुपये समर्पित केले आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी 83 वर्षीय संत स्वामी शंकर दास (Swami Shankar Das) यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे साधू गेल्या 60 वर्षांपासून गुहेत राहत आहेत.
स्वामी शंकरदास महाराज टाट वाले बाबा नावाने प्रसिद्ध आहेत. स्वामी शंकर दास यांनी आपले गुरु टाट वाले बाबांच्या गुहेत मिळणाऱ्या भाविकांच्या दक्षिणेद्वारे इतकी मोठी रक्कम उभी केली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले जाणार आहे हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. स्वामी शंकर दास जी यांनी मंदिरासाठी 1 कोटी मदत देण्याचे ठरविले व त्या रकमेचा चेक घेऊन ते ऋषिकेशच्या भारतीय स्टेट बँकेत गेले. बँक कर्मचाऱ्यांनी जेव्हा 1 कोटीचा धनादेश पहिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. एखादा साधू इतकी मोठी रक्कम देऊ शकतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. (हेही वाचा: नव्या अर्थसंकल्पात फर्नीचर, फ्रिज, वॉशिंग मशीन बद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता; पहा काय होणार स्वस्त आणि काय महाग)
त्यानंतर त्यांचे खाते तपासले गेले व बँक कर्मचाऱ्यांची खात्री पटली. बँकेने तातडीने आरएसएस अधिकाऱ्याला याची माहिती दिली, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरसेवक कृष्ण कुमार सिंघल बँकेत पोहोचले आणि स्वामी शंकर दास यांचा धनादेश राममंदिराच्या खात्यात जमा केला गेला. गेल्या 60 वर्षांपासून हे बाबा गुहेत राहत आहेत व भाविकांनी दिलेल्या दान-दक्षिणेवर त्यांची गुजराण होत आहे. आता इतक्या वर्षांमध्ये जमा केलेली रक्कम त्यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी दिली.
स्वामी शंकर दास म्हणाले की, त्यांना छुप्या पद्धतीने दान करायचे होते. पण मंदिर बांधण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळेल असा विचार करून देणगीची रक्कम उघड करण्याचे त्यांनी ठरवले.