New Defence Secretary: नवीन संरक्षण सचिव म्हणून राजेश कुमार सिंह यांनी स्वीकारला पदभार; कोण आहेत RK Singh? जाणून घ्या
आरके सिंग यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
New Defence Secretary: मोदी सरकारने ऑगस्टमध्ये राजेश कुमार सिंग (Rajesh Kumar Singh) यांची नवीन संरक्षण सचिव (New Defence Secretary) म्हणून नियुक्ती केली होती. अरमानी गिरधर (Armani Girdhar) यांच्या निवृत्तीनंतर आज आरके सिंह (RK Singh) यांनी नवीन संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. आरके सिंग यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. आज मंत्रालय असलेल्या साऊथ ब्लॉकमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. बिहारचे रहिवासी असलेले आरके सिंह केरळ केडरचे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
संरक्षण सचिव होण्याआधी ते संरक्षण मंत्रालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी पदावर कार्यरत होते. या वर्षी 20 ऑगस्ट रोजी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयात संरक्षण सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. 1 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारण्यापूर्वी राजेश कुमार सिंह यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद झालेल्या वीरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. (हेही वाचा -Bibek Debroy Passes Away: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन; 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
यावेळी आरके सिंग म्हणाले की, 'मातृभूमीच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या शूर जवानांचा देश सदैव ऋणी राहील. आपल्या सैनिकांचे विलक्षण शौर्य आणि बलिदान आपल्याला भारताला एक सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र बनवण्याचे बळ देते. हे बलिदान आपले प्रेरणास्थान आहे. राजेश कुमार सिंह यांनी 24 एप्रिल 2023 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळला होता.
दरम्यान, या अगोदर आरके सिंग पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयात पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सचिव होते. सिंग यांनी केंद्र सरकारमध्ये शहरी विकास मंत्रालयातील बांधकाम आणि शहरी वाहतूक संचालकांसह इतर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच सिंग यांनी केरळ सरकारमध्ये नगर विकास सचिव आणि वित्त सचिव म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे.