Rajasthan: नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक, जाळपोळ; कलम 144 लागू, इंटरनेट सेवा बंद
पोलीस मुख्यालयातून एडीजी आणि डीआयजींना पाठवण्यात आले आहे
राजस्थानमध्ये (Rajasthan) नवसंवत्सर निमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर अज्ञातांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याच्या घटनेमुळे शनिवारी, राज्यातील करौली (Karauli) जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथील बाजारपेठेतून बाईक रॅली निघाली होती, त्यावेळी त्यावर दगडफेक झाली. या दंगलीमध्ये सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आहेत. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला जयपूरला रेफर करण्यात आले आहे. करौलीतील काही दुकानांना आग लागली असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.
करौलीचे जिल्हाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, ‘शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.’ पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले की, दुचाकी रॅली शहरातील मुस्लिमबहुल भागातून जात असताना काही हल्लेखोरांनी रॅलीवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी काही दुचाकी आणि दुकाने जाळण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर लगेचच तणावपूर्ण परिस्थिती पाहता प्रशासनाने 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 ते 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कलम 144 लागू केले असून इंटरनेटही बंद केले आहे. सीएम अशोक गेहलोत यांनी या घटनेची माहिती घेत आवश्यक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Gudi Padwa Celebration in Nagpur: नागपुरात 'गुढीपाडव्या'चा सण मोठ्या थाटामाटात साजरा, पाहा व्हिडिओ)
आयजीपी म्हणाले की, करौलीमध्ये 100 टक्के कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, उल्लंघन करणाऱ्यांना सोडले जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत. पोलीस मुख्यालयातून एडीजी आणि डीआयजींना पाठवण्यात आले आहे. डेप्युटी एसपींनाही मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.