Sukhdev Singh Gogamedi Killers Identified: राजपूत करणी सेना प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली- राजस्थान पोलीस
करणी सेना ही राजस्थानमधील उजव्या विचारसरणीची संघटना आहे.
राष्ट्रीय राजपूत करणी सेना (Rajput Karni Sena) प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या मारेकऱ्यांची ओळख पडल्याचे राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) म्हटले आहे. करणी सेना ही राजस्थानमधील उजव्या विचारसरणीची संघटना आहे. गोगामेडी हे याच संघटनेचे प्रमुख होते. मंगळवारी (5 डिसेंबर) दुपारी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे ही हत्या गोगामोडी यांच्यासोबत चाहा घेत असलेल्या दोन व्यक्तींनी केली. या प्रकरणात पॉईंट-ब्लँक रेंज हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दोन शूटर्सची राजस्थान पोलिसांनी ओळख पटवली आहे. या हत्येमुळे राज्यात तणाव वाढला आहे, पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्यासाठी किंवा त्यांच्या कोणत्याही माहितीसाठी ₹ 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
गोगामेडी यांच्या हत्येची बातमी समजताच या राजपूत नेत्याच्या समर्थकांनी निषेधार्थ राजस्थान बंदची हाक दिली आहे. जयपूर, चुरू, उदयपूर, अलवर आणि जोधपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये गोगामेडीच्या समर्थकांनी त्वरीत न्याय मिळावा या मागणीसाठी निदर्शने सुरु आहेत. राज्यातही मोठ्या प्रमाणावर तणाव सुरु आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Jaipur Protest: करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर जयपूरमध्ये तणाव, समर्थकांकडून निदर्शने)
गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीशी जवळचा संबंध असलेला गुंड रोहित गोदारा याने फेसबुक पोस्टमध्ये सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. रोहित गोदाराने यापूर्वी सुखदेव गोगामेडी यांना धमकी दिली होती आणि राजपूरच्या नेत्याने गुंडाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, असे एनडीटीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
कॅनडास्थित गुंड ब्रार हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि देशातील विविध राज्यांना वाँटेड गुन्हेगार आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येप्रकरणीही तो वॉन्टेड आहे. गोगामेडी आणि त्यांचे दोन सहकारी या हल्ल्यात गोळ्या लागल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोगामेडीच्या साथीदारांनी एका हल्लेखोरालाही गोळीबारात मारले, असे पोलिसांनी सांगितले.
राजस्थानमध्ये झालेले हे हत्याकांड अत्यंत विचित्र अशा राजकीय स्थितीमध्ये झाले आहे. राजस्थानमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. अद्याप भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित व्हायचा आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही आणि काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक गहलोथ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे किंवा नाही याबाबतही निश्चितता नाही. अशा स्थितीत हे हत्याकांड झाले आहे.