Rahul Gandhi: मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या, राहुल गांधी आक्रमक
मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे. तुम्ही देशद्रोही आहात, असे म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला.
Rahul Gandhi On No-Confidence Motion: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये मणिपूर मुद्द्यावरुन आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना सवाल विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट दिली नाही कारण ते त्या राज्याला भारताचा भागच मानत नाहीत. मणिपूर हा भारतमातेचाच एक भाग आहे. मात्र, मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली. या सरकारने ती केली आहे, असा घणाघाती आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi On Manipur issue) यांनी केला आहे. विरोधी पक्षाची आघाडी INDIA ने दाखल अविश्वास प्रस्तावावर ते लोकसभेमध्ये बोलत होते.
नरेंद्र मोदी केवळ अमित शाह आणि अदानी यांचेच ऐकतात
राहुल गांधी यांनी आक्रमक होत आपल्या भाषणात रामायणाचेही दाखले दिले. रावणाला रामाने मारले नव्हते. रावणाला त्याच्या अहंकाराने मारले. तो केवळ दोनच लोकांचे ऐकत असे. एक कुंभकरण आणि दुसरा त्याचा अहंकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा दोन लोकांचेच ऐकतात. एक अमित शाह आणि दुसरे गौतम अदानी.
तुम्ही देशद्रोही आहात- राहुल गांधी
मी मणिपूरला जाऊन आलो. तिथल्या महिलांना भेटलो. एका महिलेने सांगितले तिच्या एकूलत्या एक मुलाची हत्या करण्यात आली. तिने त्या मुलाच्या मृतदेहासोबत संपूर्ण रात्र घालवली. आता फक्त त्याचा केवळ एक फोटो घेऊन तिने घर-दार सोडले. दुसरी एक महिला तर तिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे बेशुद्ध पडली, असे राहुल गांधी म्हणाले. केंद्र सरकारने केवळ मणिपूरचीच हत्या केली नाही. तर भारतमातेची हत्या केली आहे. देशाच्या आवाजाची हत्या केली आहे. तेशाच्या आवाजाची हत्या करणारे लोक देशप्रेमी नसतात. देशद्रोही असतात. तुम्ही देशद्रोही आहात, असा घणाघात करत राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचार विषयावर भाष्य केले.
व्हिडिोओ
आज मी अदानीवर बोलणार नाही- राहुल गांधी
आपल्या भाषणाची सुरुवात करताना, काँग्रेस राहुल गांधी यांनी प्रथम संसदेत प्रवेश दिल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. मग सरकारवर हल्ला करताना ते म्हणाले, 'काळजी करू नका, आज अदानींवर बोलणार नाही'