Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव अवमाना प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळणार की, शिक्षा कायम राहणार? गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

Rahul Gandhi | (Photo Credit: ANI)

मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय (Gujarat High Court) शुक्रवारी सकाळी 11 वाजता निकाल देणार आहे. हा निर्णय न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक देणार आहेत. दरम्यान न्यायालयानं दोषी ठरल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमध्ये केंद्र सरकारवर आरोप करत गंभीर वक्तव्य केलं होतं. केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, पण ते घाबरत नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी करत आहेत.  (हेही वाचा - Rahul Gandhi Meets Sharad Pawar: राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, काँग्रेसने आधीच दर्शवला आहे पाठिंबा)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. सर्व चोरांची नावे मोदी कशी काय? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. याप्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर सुरत येथील सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानेही त्यांचे सदस्यत्व (खासदार पद) रद्द केले होतं.

राहुल गांधी यांनी सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने अंतिम निर्णय येईपर्यंत शिक्षेला स्थिगिती दिली होती. याप्रकरणात गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असून आज कोर्ट यावर निकाल देणार आहे.