आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने सन्मान गमावला- राहुल गांधी
कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, अर्थव्यवस्था, राजकारण, विकासदर अशा एक ना अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना टीकेचे लक्ष्य बनवले आहे.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 'भारताने आंतरराष्ट्रीय पातळीव सन्मान गमावला आहे' असे ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणावर बुधवारी (15 जुलै) टीका केली. राहुल गांधी यांनी एक बातमी शेअर करत म्हटले आहे की, भारताची आंतरराष्ट्रीय रणनितीची घडी विस्कटली आहे. त्यामुळे भारताला अनेक ठिकाणी आपला आत्मसन्मान गमवावा लागत आहे. केंद्र सरकारला हे माहित नाही की अशा वेळी काय करायला हवे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये शेअर केलेल्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, चाबाहार ते जाहेदान पर्यंत उभारण्यात येणाऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पातून इराणने भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हा प्रकल्प अफगाणिस्तान सीमेलगत उभारण्यात येणार होता. भारताने आवश्यक निधी वेळेत दिला नसल्याचे कारण देत इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. दरम्यान, इराणने आता हा प्रकल्प एकट्यानेच पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. ‘द हिंदू’ने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Coronavirus: भारत या आठवड्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत 10 लाखांचा टप्पा पार करेल- राहुल गांधी)
गेल्या प्रदीर्घ काळापासून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, अर्थव्यवस्था, राजकारण, विकासदर अशा एक ना अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना टीकेचे लक्ष्य बनवले आहे. लद्दाक मुद्द्यावरुनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.