Rahul Gandhi Security: राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हल्ला होईल, असा नाशिक पोलिसांना फोन आला होता. दरम्यान फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे.
राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देण्यात आल्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त (Bharat Jodo Nyay Yatra) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये येणार आहेत. यानिमित्त नाशिक काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा - Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' 10 मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)
8 दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना फोनद्वारे मिळाली होती माहिती. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हल्ला होईल, असा नाशिक पोलिसांना फोन आला होता. दरम्यान फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलसांची नजर कायम आहे.
दरम्यान त्या व्यक्तीला दारूचं व्यसन जडलं आहे. मानसिक वैफल्यातून त्याने हा फोन केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरीही संबंधित व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. खबरदारी म्हणून मोथेफीरूवर नजर ठेवण्यात आलं आहे. तसंच संबंधित यंत्रणांनाही याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी सांगितले की, आठ ते दहा दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता. राहुल गांधी यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे. राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली होती.