Pune Metro: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या मंडई स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांत तात्पुरता बदल

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुणे मेट्रोने ५ सप्टेंबर रोजी महात्मा फुले मंडई स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांमध्ये तात्पुरता बदल केला आहे.

Dahi Handi 2024| X @ANI

शहरातील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावरील प्रवाशांच्या हालचालींसाठी तात्पुरती नवी नियमावली जाहीर केली आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानकातील गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी प्रवेश (Entry) आणि बाहेर पडण्याच्या (Exit) मार्गांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.

दिवसभरासाठी लागू राहतील नवे नियम

पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, हा बदल ५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहील. मध्यवर्ती पुण्यातील मंडई परिसरात दहीहंडी पाहण्यासाठी तसेच उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक एकत्र येतात. त्यामुळे स्थानकात गोंधळ किंवा चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र गेट्स निश्चित

गर्दी सुरळीत हाताळता यावी यासाठी मेट्रो प्रशासनाने स्वतंत्र गेट्स निश्चित केली आहेत:

प्रवेशासाठी (Entry): लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळील गेट क्रमांक ३ हे केवळ स्थानकात प्रवेश करण्यासाठी खुले ठेवण्यात येईल.

बाहेर पडण्यासाठी (Exit): छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर महात्मा फुले मंडईच्या पाठीमागे असलेले गेट क्रमांक २ हे प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

रविवारपासून सेवा पूर्ववत होणार

उत्सव संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, ६ सप्टेंबरपासून महात्मा फुले मंडई स्थानकातील सर्व प्रवेश व निर्गमन द्वारे नेहमीप्रमाणे सुरू राहतील. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी आणि मेट्रो स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement