Pune Metro Line 3: PMRDA चा नवीन प्लॅन, मेट्रो स्थानकांपर्यंत नव्या रस्त्यांचा प्लॅन, हिंजवडीत ट्रॅफिकची कटकट संपणार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग ३ वरील पहिल्या आठ स्थानकांसाठी सुमारे १९.२ किलोमीटरचे 'लास्ट माईल' रस्ते आणि पादचारी नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान धावणाऱ्या पुणे मेट्रो मार्ग ३ वरील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पावले उचलली आहेत. या मेट्रो मार्गावरील हिंजवडी भागातील पहिल्या आठ स्थानकांसाठी सुमारे १९.२ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते आणि पादचारी नेटवर्क विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. रहिवासी भाग आणि कार्यालयांमधून नागरिकांना विनाअडथळा मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचता यावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पहिल्या टप्प्यात हिंजवडीतील आठ स्थानके समाविष्ट
या योजनेअंतर्गत हिंजवडी बाजूकडील पहिल्या आठ स्थानकांभोवती रस्ते आणि पादचारी सुविधांचे जाळे उभारले जाईल. यामध्ये मेगापोलिस सर्कल, क्वाड्रॉन सर्कल, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजीज, पॉल इंडिया, शिवाजी चौक आणि हिंजवडी या स्थानकांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे १० किलोमीटर लांबीच्या मेट्रो पट्ट्यात १९.२ किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांची जोडणी निश्चित करण्यात आली आहे.
यामध्ये सर्वाधिक ४.८९ किलोमीटरचे रस्ते जाळे शिवाजी चौक स्थानकाभोवती, ४.०६ किलोमीटरचे जाळे मेगापोलिस सर्कलजवळ, ३.६र्ट किलोमीटरचे जाळे क्वाड्रॉन सर्कलजवळ आणि १.८५ किलोमीटरचे जोड रस्ते हिंजवडी स्थानकाभोवती विकसित केले जातील.
पादचारी सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर
पीएमआरडीएच्या आराखड्यानुसार, हा प्रकल्प केवळ रस्ते रुंदीकरणापुरता मर्यादित नसून तो सर्वसमावेशक पादचारी व वाहतूक व्यवस्थापनावर आधारित आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र पादचारी मार्ग (फूटपाथ), शक्य तिथे सायकल ट्रॅक, सुरक्षित पादचारी क्रॉसिंग, स्पीड-टेबल क्रॉसिंग, रस्त्यांवरील दुभाजक सुधारणा आणि पादचारी रिफ्युज आयलंड उभारले जातील. याशिवाय बस व रिक्षा थांबे, वाहनतळ व्यवस्था (पार्किंग), पथदिवे, माहिती फलक आणि वाहतूक नियंत्रक उपाय केले जातील.
सल्लागार नेमणुकीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
या कामाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR), खर्च अंदाज, रस्त्यांचे डिझाइन आणि प्रत्यक्ष कामाच्या देखरेखीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्यासाठी पीएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियुक्त होणारा सल्लागार प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती, सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेतील वाहतूक व पादचाऱ्यांची वर्दळ आणि पार्किंगच्या मागणीचा सखोल अभ्यास करेल. तसेच एमआयडीसी, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अंतिम आराखडा तयार केला जाईल.
आयटीयन्ससह स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
हिंजवडी आयटी पार्क आणि मध्यवर्ती पुण्याच्या दरम्यान मेट्रो मार्ग ३ हा वाहतुकीचा महत्त्वाचा कणा ठरणार आहे. मात्र, घरापासून अथवा कार्यालयापासून थेट मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग नसल्यास प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानकांभोवती अंतर्गत रस्ते आणि दर्जेदार पादचारी मार्ग तयार झाल्यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळून मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2026 07:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

