IPL Auction 2025 Live

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यासंदर्भातील अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शिक्कामोर्तब; आजपासून देशभरात लागू होणार कायदा

त्याचबरोबर हा अध्यादेश आजपासून देशभरात कायद्याच्या रुपात लागू होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits : Getty)

कोरोना व्हायरस संकटकाळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केला आहे. त्याचबरोबर हा अध्यादेश आजपासून देशभरात कायद्याच्या रुपात लागू होणार आहे. महासाथीविरोधातील कायदा 2020 अंतर्गत देशातील आरोग्य, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. अशा गुन्हेगारांचा शोध 30 दिवसांच्या आत घेण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल.

कोरोना व्हायरस संकटाच्या कठीण काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसंच या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने डॉक्टरांनी याविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करुन गृहमंत्रालयाच्या सहभागाने या विरोधात कायद्याची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ANI Tweet:

यासंदर्भात बुधवारी कॅबिनेट मधून अध्यादेश जारी करण्यात आला त्याला आज (गुरुवारी) राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर महासाथीविरोधातील कायदा 1897 मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील गुन्हा अजामीनपात्र ठरणार आहे. तसंच गुन्हेगारांचा शोध 30 दिवसात घेण्यात येईल आणि त्यावर एका वर्षात निर्णय घेण्यात येईल.

तसंच सुधार कायद्याअंतर्गत 3 ते 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तसंच 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ला गंभीर असल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.