Sejal Pawar Controversy: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; मृतदेहांच्या गुप्तांगावरील विधानामुळे नेटकरी संतापले

प्रसिद्ध कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमधील एका महिला डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणासाठी दान केलेल्या पुरुषांच्या मृतदेहांच्या गुप्तांगांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बिग बॉस फेम आणि स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हायरल क्लिपमध्ये केईएम रुग्णालयाशी संबंधित डॉ. सेजल पवार नावाची एक महिला डॉक्टर वैद्यकीय शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी दान केलेल्या पुरुषांच्या मृतदेहांच्या (Cadavers) गुप्तांगांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्स, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याला असंवेदनशील म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये नक्की काय आहे?

प्रणीत मोरे याच्या शो दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या डॉ. सेजल पवार हिच्याशी संवाद साधण्यात आला होता. या संवादादरम्यान प्रणीतने विचारले की, शवविच्छेदन (Autopsy) करताना किंवा अभ्यासादरम्यान डॉक्टर गंभीर असतात की विनोद करतात? यावर उत्तर देताना सेजल हिने सांगितले की, हो आम्ही विनोद करतो. तिने पुढे सांगितले की, अभ्यासादरम्यान महिला वैद्यकीय विद्यार्थी पुरुषांच्या मृतदेहांच्या गुप्तांगांच्या आकाराची तुलना करतात आणि त्यांची खिल्ली उडवतात. हा संवाद ऐकल्यानंतर प्रणीत मोरेने देखील आश्चर्य व्यक्त केले होते.

सोशल मीडियावर तीव्र पडसाद आणि वैद्यकीय नैतिकतेवर प्रश्न

हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी या वक्तव्याचा कडाडून निषेध केला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, लोक वैद्यकीय विज्ञानाचा अभ्यास व्हावा आणि समाजाची सेवा घडावी म्हणून आपल्या प्रियजनांचे मृतदेह दान करतात. अशा पवित्र भावनेने दान केलेल्या मृतदेहांची सार्वजनिक ठिकाणी अशी खिल्ली उडवणे अत्यंत लज्जास्पद आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, शरीरशास्त्राच्या (Anatomy) पहिल्या पानावरील नियमांचे हे पूर्णपणे उल्लंघन असून हा प्रकार वैद्यकीय नैतिकतेला धरून नाही.

सेजल पवार कोण आहेत?

Who is Dr Sejal Pawar: मिळालेल्या माहितीनुसार, सेजल पवार या एक वैद्यकीय डॉक्टर आहेत. प्रणित मोरे यांच्या 'स्टँड-अप' शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या सत्रात त्या सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावरील चर्चा आणि उपलब्ध माहितीनुसार, त्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी मुंबईतील 'केईएम' (KEM) रुग्णालयात काम केल्याचे मानले जाते. सेलिब्रिटी किंवा प्रसारमाध्यमांमधील व्यक्ती म्हणून त्यांची कोणतीही सार्वजनिक ओळख यापूर्वी नव्हती; 'क्राउडवर्क'ची (प्रेक्षकांशी साधलेल्या संवादाची) ती क्लिप व्हायरल झाल्यानंतरच त्या लोकांच्या नजरेत आल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement