Prajwal Revanna Sex Video Row: एचडी देवे गौडा यांचा मुलगा H.D. Revanna व नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; जाणून घ्या काय आहे कर्नाटकातील सेक्स स्कँडल
प्रज्वल रेवण्णाने याचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला आहे.
Prajwal Revanna Sex Video Row: सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत माजी पंतप्रधान एचडी देवे गौडा (H. D. Deve Gowda) यांचा मुलगा एचडी रेवण्णा (H.D. Revanna) आणि नातू प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातू हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यासह खासदार प्रज्वल रेवण्णा हे सध्या एका मोठ्या अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्येही (Sex Scandal) अडकले आहेत. त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेने एचडी रेवन्ना आणि प्रज्वल यांच्यावर लैंगिक छळ आणि विनयभंगासारखे गंभीर आरोप केले आहेत. या 47 वर्षीय पीडितेने रेवण्णा यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे पीडित महिला ही एचडी रेवण्णाच्या पत्नीची नातेवाईक असल्याचेही सांगितले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रज्वल रेवन्ना हे खासदार आहेत, त्यांचे आजोबा पंतप्रधान, काका मुख्यमंत्री आणि वडील मंत्री राहिले आहेत. अशात इतक्या जबाबदार आणि मोठ्या व्यक्तींवर असे गंभीर आरोप खरोखरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
गेल्या काही दिवसांपासून प्रज्वल रेवण्णाशी संबंधित अनेक अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यांच्याकडील पेन ड्राईव्हमध्ये शेकडो अश्लील व्हिडीओ क्लिप असल्याचेही बोलले जात आहे. प्रज्वल रेवण्णा सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हसनमधून खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. कर्नाटकात 26 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात प्रज्वल रेवण्णा यांनी जेडीएसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि आता सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानंतर रेवण्णा देश सोडून पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बीके सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: MP Prajwal Revanna: माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने कर्नाटकात खळबळ, चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना)
रेवण्णा यांच्या घरातील महिला मदतनीसाच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने फिर्यादीत म्हटले आहे, नोकरीत रुजू झाल्यानंतर चार महिन्यांनी एचडी रेवन्ना तिचा लैंगिक छळ करू लागले, तर प्रज्वल तिच्या मुलीला व्हिडिओ कॉल करून ‘अश्लील शेरेबाजी’ करत असे.
तिने पुढे सांगितले की, इतर महिलांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने हिंमत एकवटली आणि तक्रार दाखल केली. महिलेने पुढे नमूद केले की, एचडी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांनी मिळून अनेक महिलांचा लैंगिक छळ केला आहे. एचडी रेवण्णा घरात एकटे असल्यावर ते महिला कर्मचाऱ्यांना अयोग्यरित्या स्पर्श करत असे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत लैंगिक छळ आणि संबंधित गुन्ह्यांसाठी औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
दुसरीकडे, भाजप नेते देवराज गौडा यांनी दावा केला आहे की, त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिले होते की त्यांना एक पेन ड्राईव्ह सापडला होता, ज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह महिलांच्या लैंगिक कृत्यांचे सुमारे 3,000 व्हिडिओ आहेत. प्रज्वल रेवण्णाने याचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला आहे.