Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2023 Application Last Date: पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत महिनाभराने वाढवली; 31 ऑगस्ट पर्यंत करा अर्ज
पुरस्काराचं नाव बदलून 'बाल शक्ती पुरस्कार' असं ठेवण्यात आलं आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar) अर्ज सादर करण्याची अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यंदा 31 जुलै 2023 पर्यंत स्वीकरले जाणारे अर्ज आता 31 ऑगस्ट 2023 पर्यंत स्वीकारले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक असलेले आणि भारताचा रहिवासी असलेले कोणतेही लहान मूल, ज्याचे वय 18 वर्षांहून जास्त नाही (अर्ज/ नामांकन सादर करण्याच्या अंतिम तारखेला) या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकते. अथवा कोणतीही इतर व्यक्ती देखील पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या मुलाचे नामांकन सादर करू शकते. पीएमआरबीपीसाठीचे अर्ज केवळ या पुरस्कारांसाठी विहित केलेल्या https://awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील.
प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक, रोख रु. 1 लाख आणि प्रमाणपत्र दिले जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांचं वितरण केले जाते. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनामध्येसुद्धा ही मुलं सहभागी होतात. 2018 मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं. पुरस्काराचं नाव बदलून 'बाल शक्ती पुरस्कार' असं ठेवण्यात आलं आहे.