PM Modi Maharashtra Visit: गुढी पाडव्याला पीएम नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्‍यावर; नागपूर मध्ये स्मृती मंदिरात घेणार दर्शन, पहा कसा असेल त्यांचा कार्यक्रम

हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील आणि आर एस एस च्या संस्थापकांना आदरांजली वाहतील.

PM Modi (फोटो सौजन्य - ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 30 मार्च दिवशी महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. 30 मार्चला यंदा गुढीपाडवा  (Gudhi Padwa) अर्थात हिंदू नववर्षाचा (Hindu New Year) पहिला दिवस आहे. पीएम मोदी महाराष्ट्रात नागपूरला भेट देणार आहेत. हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील आणि आर एस एस च्या संस्थापकांना आदरांजली वाहतील. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह 1956 मध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्या दीक्षाभूमीला भेट देऊन पंतप्रधान आदरांजली वाहणार आहेत.

पंतप्रधान माधव नेत्रालय नेत्र चिकित्सा आणि संशोधन केंद्राच्या नवीन विस्तारित इमारतीची म्हणजे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. 2014 मध्ये स्थापन झालेले हे नेत्रालय नागपूरमधील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे. गुरुजी माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली. आगामी प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि 14 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणे आहे, हा यामागील उद्देश आहे.

पंतप्रधान नागपुरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा केंद्राला भेट देणार आहेत. नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी (UAVs) नव्याने बांधण्यात आलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टीचे आणि लोइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करतील.

दरम्यान महाराष्ट्रानंतर ते छत्तीसगडला जाणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिलासपूर येथे सुमारे 33,700 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकासकामांची पायाभरणी, कार्याचा शुभारंभ आणि राष्ट्रार्पण होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement