उद्या पार पडेल Jammu and Kashmir च्या नेत्यांसोबत PM Narendra Modi यांची बैठक; सीमेवर जारी केला 48 तासांचा अलर्ट
त्यास उपस्थित राहण्यासाठी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती बुधवारी दिल्लीला पोहोचल्या
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) राजकीय प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक गुरुवारी दिल्लीत होणार आहे. त्यास उपस्थित राहण्यासाठी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती बुधवारी दिल्लीला पोहोचल्या, तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला गुरुवारी दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या 8 राजकीय पक्षांच्या 14 नेत्यांसमवेत बैठक घेणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे लागलेले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या सीमांकनापासून ते विधानसभा निवडणुका घेण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. परंतु त्याचवेळी पक्षांमधील सुरू असलेला प्रतिकार दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेनंतर राज्याला जे काही साध्य झाले आहे आणि राज्याच्या विकासासाठी जे काही करता येईल यावर खुल्या मनाने चर्चा व्हायला हवी, असे पंतप्रधान मोदींना वाटते आहे.
यासाठी जम्मू-काश्मीरमधील सर्व पक्षांनी खुल्या मनाने आपले विचार मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही बैठक दिल्लीत सुरू असताना भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा संस्था सतर्क राहतील. खोऱ्यासह नियंत्रण रेषेवर या बैठकीमुळे 48 तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच हायस्पीड इन्टरनेट सेवाही बंद करण्यात येऊ शकते.
हा महाबैठकीपूर्वी मंगळवारी श्रीनगर येथे गुपकर संघटनेची बैठक झाली होती. ही बैठक माजी केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. गुपकर नेत्यांच्या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला आपण उपस्थित राहू, बैठकीनंतर श्रीनगर आणि दिल्ली येथे माध्यमांशी चर्चा केली जाईल. आमचा अजेंडा सर्वांना माहित आहे आणि तोच राहील.
जम्मू-काश्मीरच्या एकूण 14 नेत्यांना सर्वपक्षीय बैठकीसाठी केंद्र सरकारने आमंत्रित केले आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370, 35 ए रद्द केल्यानंतर म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू-काश्मीरमधील सर्व मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांशी पंतप्रधान मोदींचा हा पहिला संवाद असेल.