PM नरेंद्र मोदी यांनी भारताची UNSC मध्ये तात्पुरता सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर मानले ग्लोबल कम्युनिटीचे आभार; जागतिक शांतता, सुरक्षा साठी करणार काम
8व्यांदा भारताच्या झालेल्या या निवडीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जागतिक संघटनेचे आणि सदस्यांचे आभार मानले आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारत देश 2021-22 साठी तात्पुरत्या सदस्य म्हणून निवडला गेला आहे. 8व्यांदा भारताच्या झालेल्या या निवडीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जागतिक संघटनेचे आणि सदस्यांचे आभार मानले आहेत. आज (18 जून) ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी हा मेसेज शेअर केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या निवडीसाठी पाठिंबा दाखवलेल्या ग्लोबल कम्युनिटीचे आभार! भारत जागतिक शांतता, सुरक्षा, समानता वाढवण्यासाठी काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. UNSC Elections 2020: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताची 2021-22 साठी तात्पुरत्या सदस्यपदी निवड.
दरम्यान अमेरिकेमध्ये काल संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात कोरोना संकटकाळातही पुरेशी खबरदारी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळेस भारताच्या पारड्यात 192 पैकी 184 मतं पडली आणि 2021-22 या वर्षभराच्या कालावधी आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तात्पुरत्या सदस्य म्हणून निवड झाली आहे. दरम्यान भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे यांचीदेखील निवड झाली आहे. तर फ्रांस, ब्रिटन, अमेरिका, रशिया, चीन हे पाच देश संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्य देश आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
भारताचे संयुक्त राष्ट्रामधील प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी ही माहिती दिल्यानंतर देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे.
भारत देश यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तात्पुरत्या सदस्य म्हणून 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-12 साली निवडला गेला होता.