PM Narendra Modi Speech: 'लॉक डाऊन संपला आहे, कोरोना व्हायरस नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काळजी घेणे आवश्यक'- पीएम नरेंद्र मोदी, जाणून घ्या आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
सध्या देशात चालू असलेल्या कोरोना विषाणू (coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी देशासमोर काही महत्वपूर्ण गोष्टी मांडल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशाला संबोधित केले. सध्या देशात चालू असलेल्या कोरोना विषाणू (coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी देशासमोर काही महत्वपूर्ण गोष्टी मांडल्या. यावेळी ते म्हणाले, ‘कोरोना विषाणू सुरु झाल्यापासून आपण सर्वांनी फार मोठे अंतर पार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉक डाऊनमध्ये (Lockdown) शिथिलता आणल्याने आर्थिक बाबी सुरु झाल्या आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत, बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र आम्हाला हे विसरून चालणार नाही की, लॉक डाऊन संपले आहे, व्हायरस नाही.’
पुढे ते म्हणाले, ‘भारताचा रिकव्हरी रेट चांगला आहे, रुग्णांची मृत्यू संख्या कमी झाली आहे. अमेरिका व ब्राझीलच्या तुलनेत भारताची स्थिती फारच चांगली आहे. भारतामध्ये 12 हजार कोरोना विषाणू सेंटर आहे. कोरोना विषाणूच्या बाबतीत टेस्टिंगची वाढवण्यात आलेली संख्या भारतासाठी फायदेशीर ठरली आहे. अनेक डॉक्टर, नर्सेस इतर आरोग्य कर्मचारी देशवासीयांची सेवा करत आहे. मात्र देशाची स्थिती जरी चांगली झाली असली तरी कोरोना पूर्णतः गेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये दिसून येत आहे की, लोकांनी काळजी घेणे कमी केले आहे. मात्र हे योग्य नाही. यामुळे तुम्ही आपल्यासोबतच इतरांनाही संकटात ओढत आहात.’
‘जोपर्यंत या विषाणूवर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण काळजी घेणे थांबवायचे नाही. भारतासह अनेक देश या विषाणूविरुद्ध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतामध्येही याबाबत प्रयत्न सुरु आहेत. लस उपलब्ध झाल्यावर ती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. जोपर्यंत रोगाचे समूळ नाष्ट होत नाही तोपर्यंत याला गांभीर्याने घेतले पाहिजे. सणाच्या काळात सर्वांनी स्वतःची काळजी घेत सतर्क राहिले पाहिजे.’
पुढे त्यांनी माध्यमांना या विषाणू बाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शेवटी त्यांनी देशवासियांना नवरात्र, दिवाळी, छट पूजा, गुरु नानक जयंती, ईद या सणांच्या शुभेच्छा दिल्या. पीएम नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात जनतेला पुन्हा एकदा व्यवस्थित काळजी घेणे, कोरोना विषाणू नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: पंतप्रधान मोदी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान म्हणाले आजच्या भाषणात 'या' मुद्द्याबाबतही बोला')
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून पंतप्रधानांनी सात वेळा राष्ट्राला संबोधित केले आहे. त्यांनी मार्च महिन्यात याची सुरूवात केली आणि 19 मार्च रोजी त्यांनी जनता कर्फ्यूसाठी लोकांना आवाहन केले. यानंतर, 24 मार्च रोजी राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. नंतर देशाला संबोधित करताना त्यांनी आत्मनिभार भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. 24 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. पीएम मोदी यांनी 3 एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून 12 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये त्यांनी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.