Rahul Gandhi On Gautam Adani & PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, कोणतीही कारवाई केली तरी लढत राहीन- राहुल गांधी
देशातील लोकशाही संपविण्याचे काम सुरु आहे. माझ्यावर कोणतीही आणि कितीही कारवाई झाली तरी आपण सरकारला घाबरणार नाही, असा थेट इशारा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासोबत असलेल्या संबंधांवरुन विचारलेल्या प्रश्नामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) घाबरले आहेत. देशातील लोकशाही संपविण्याचे काम सुरु आहे. माझ्यावर कोणतीही आणि कितीही कारवाई झाली तरी आपण सरकारला घाबरणार नाही, असा थेट इशारा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारला दिला आहे. याच वेळी राहुल यांनी अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत? असा सवालही विचारला. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीवरुन दाखल झालेल्या अवमान प्रकरणात सूरतमधील कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या काहीच तासात लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवले. या सर्व घडामोडी नंतर राहुल गांधी (Rahul Gandhi On Gautam Adani & PM Narendra Modi) आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधी यांनी म्हटले की, माझ्यावर केली जाणारी कारवाई हे एक नाटक आहे. मी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात नेमके नाते काय आहे? हे नाते अलीकडील काळातील नाही. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते मोदी पंतप्रधान असे पर्यंत आणि वर्तमान काळातही सुरु आहेत. गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवले गेलेले 20,000 कोटी रुपये कोणाचे होते, असा सवाल आपण विचारल्यामुळेच कारवाईचे नाटक रचले जात असल्याचा वार राहुल गांधी यांनी केला आहे. (हेही वाचा, Modi Means Corruption: 'मोदी म्हणजे भ्रष्टाचार!' भाजप नेत्या खुशबू सुंदर ट्विट व्हायरल; राहुल यांच्या लोकसभा अपात्रतेचीही जोरदार चर्चा)
ट्विट
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, काहीही करा. मला मारा, तुरुंगात टाका पण मी घाबरणार नाही. भारत आणि भारताच्या लोकशाहीसाठी, घटनात्मकता टीकण्यासाठी मी प्रश्न विचारेन. प्रश्न विचारत राहिन. केवळ देशच नव्हे तर संसदेतही विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. संसदेंमध्ये माझ्या भाषणावेळी आवाज बंद केला जातो. माझे भाषणही संसदेच्या कामकाजावरुन काढून टाकण्यात आले. माझ्याबद्दल खोटा प्रचारही केला की मी विदेशात जाऊन परकीय शक्तींची मदत घेतली. पण मी असे काहीही केले नाही. मी प्रश्न विचारमे थांबवत नाही, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत.
ट्विट
राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला करत म्हटले की, त्यांनी मला कायमचे अपात्र केले तरी मी माझे काम करत राहीन. मी संसदेत असलो किंवा नसलो तरी काही फरक पडत नाही. मी देशासाठी लढत राहणार. देशाच्या लोकशाही स्वरूपाचे रक्षण करणे म्हणजे देशाच्या संस्थांचे रक्षण करणे. देशातील गरीब लोकांच्या आवाजाचे रक्षण करणे आणि पंतप्रधानांशी असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेणाऱ्या अदानीसारख्या लोकांबद्दल लोकांना सत्य सांगणे हे माझे काम आहे.