IPL Auction 2025 Live

Kolkata Fire Tragedy: रेल्वे इमारतीच्या आगीत 9 मृतांच्या कुटुंबियांना PM Narendra Modi यांच्याकडून मदत जाहीर

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी कोलकाता येथील रेल्वे इमारतीला लागलेल्या आगीची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: ANI/File)

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये काल रेल्वेच्या एका इमारतीला आग लागली होती. या भीषण आगीमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान या आगीच्या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीररित्या जखमी असणार्‍यांसाठी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील कोलकाता मधील या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 4 फायर फायटर, 2 रेल्वे कर्मचारी आणि पोलिस एएसआय यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान काल आगीचं वृत्त समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर बचावकार्य वेगवान करण्याच्या सूचना केल्या होत्या. ममता बॅनर्जींकडून या आगीमध्ये मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत आणि घरातील एका व्यक्तीला नोकरीची संधी दिली जाईल असं सांगितलं आहे.

ANI Tweet

कोलकाता मधील आग ही ईस्टर्न रेल्वेच्या एका इमारतीला लागली होती. त्यामुळे आगीचा परिणाम तिकीट बुकिंगवर झाला होता. पूर्व भारताच्या प्रवासी आरक्षण प्रणालीचा सर्व्हर या आग लागलेल्या इमारतीमध्ये होता त्यामुळे तो काही काळ बंद ठेवण्यात आला होता. आगीदरम्यान वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. सर्व्हर डाऊन असल्याने काही काळ ईस्टर्न झोन मधील तिकीट विक्रीवर परिणाम झाला आहे.