अभिमानस्पद! 16 वर्षांचा प्रियव्रत पाटील ठरला 'तेनाली महापरीक्षा' पूर्ण करणारा सर्वात तरुण विद्यार्थी; पीएम नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

इतक्या कमी वयात त्याने तेनाली परीक्षेचे (Tenali Pariksha) 14 स्तर पास करून इतिहास घडवला आहे. 16 वर्षांच्या प्रियव्रत देवदत्त पाटील याने आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचे शिक्षण घेत असताना, श्री मोहन शर्मा यांच्याकडे सर्व व्याकरण महाग्रंथांचा अभ्यास केला

PM Narendra Modi Congratulates 16-Year-Old Priyavrata (Photo Credits: PTI/Twitter @NarendraModi)

भारत देशात नांदणारी हिंदू संस्कृती ही संपूर्ण जगामध्ये सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. वेद, पुराण, शास्त्र यांचे शिक्षण इथेच आधीपासून  दिले जात होते. पूर्वी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. आता काळानरूप गोष्टी बदलत आहेत. मात्र अजूनही काही लोक आहेत जे ही भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. यामध्ये आता एका 16 वर्षांच्या मुलाची भर पडली आहे. प्रियव्रत पाटील (Priyavrata Devadatta Patil) आहे या मुलाचे नाव असून तो अवघ्या 16 वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याने तेनाली परीक्षेचे (Tenali Pariksha) 14 स्तर पास करून इतिहास घडवला आहे.

16 वर्षांच्या प्रियव्रत देवदत्त पाटील याने आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचे शिक्षण घेत असताना, श्री मोहन शर्मा यांच्याकडे सर्व व्याकरण महाग्रंथांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी सर्व 14 स्तर यशस्वी पूर्ण करून सर्वात कमी वयात तेनाली महापरीक्षेत यश मिळवण्याचा विक्रम केला आहे. ही खचितच भारतासाठी अभिमानाची बाबा आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी प्रियव्रतचे अभिनंदन करून त्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इंडिक अकादमी (Indic Academy) तेनाली परीक्षांना, ‘ओपन युनिव्हर्सिटी’ सारखी चालणारी अनोखी संस्था पाठिंबा देते. विद्यार्थी आपल्या गुरूंसोबत देशाच्या विविध भागात राहतात आणि पारंपारिक ‘गृह गुरुकुल’ प्रणालीनुसार शिकतात. वर्षातून दोनदा सर्व गुरु व विद्यार्थी त्यांच्या लेखी व तोंडी सेमिस्टर परीक्षेसाठी तेनाली येथे एकत्र येतात. विद्यार्थ्यांच्या 5-6 वर्षांच्या अभ्यासानंतर कांची मठाच्या देखरेखीखाली महापरीक्षा' घेतली जाते.

गेल्या 40 वर्षांमध्ये, 'तेनाली परीक्षा' शास्त्र अभ्यासाच्या क्षेत्रातील एक विलक्षण संस्था बनली आहे. इंडिक अकादमी सध्या विविध शास्त्राच्या अभ्यासासाठी 40 विद्यार्थ्यांना मदत करत आहे.