Plasma Therapy: प्लाझ्मा थेरेपी बंद करण्याचा विचार सुरू, कोरोना विषाणू उपचारांमध्ये ठरली नाही प्रभावी- ICMR

यामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्लाझ्मा थेरपीचा (Plasma Therapy) वापर वाढला होता.

Plasma Donation| Image Used For Representational Purpose Only| Photo Credits: IANS

भारतामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. यामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्लाझ्मा थेरपीचा (Plasma Therapy) वापर वाढला होता. आता इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) प्लाझ्मा थेरपीबाबत मोठे विधान केले आहे. आयसीएमआरने सांगितले की ते नॅशनल हेल्थ क्लिनिकल प्रोटोकॉलमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याचा विचार करीत आहेत. आयसीएमआरने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, अनेक अभ्यासांमध्ये यापूर्वीही असे म्हटले आहे की मृत्यु दर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी फार प्रभावी नाही.

कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये तपासणी उपचार म्हणून यापूर्वी प्लाझ्मा थेरपीला परवानगी होती. आयसीएमआरने यापूर्वी बर्‍याच वेळा प्लाझ्मा थेरपीच्या प्रभावीपणावर प्रश्न उभे केले होते. अलीकडेच, त्यांनी सांगितले की कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीऐवजी अँटीसेरा आता चांगला पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. आयसीएमआरने कोरोनावर उपचार करण्यासाठी प्राण्यांच्या रक्ताच्या सीरमचा वापर करून अत्यंत शुद्ध अँटीसेरा विकसित केल्याचा दावा केला आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, 'आम्ही राष्ट्रीय टास्क फोर्ससोबत चर्चा केली आहे. आता राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांमधून प्लाझ्मा थेरपी हटवण्यासाठी संयुक्त देखरेखीच्या गटाशी चर्चा करीत आहोत. ही चर्चा चालू आहे आणि आम्ही लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचू.' गेल्या महिन्यांत 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 39 रूग्णालयात झालेल्या चाचणीचा निष्कर्ष आता सार्वजनिक झाला आहे, जो दर्शवितो की, प्लाझ्मामुळे कोविड-19 रूग्णांना मृत्यू दर कमी करण्यात किंवा आजाराची प्रगती कमी होण्यास फायदा झाला नाही.

कोरोना संकटाच्या काळात प्लाझ्मा थेरपी लोकप्रिय ठरली होती. कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांच्या शरीरातून घेतलेला प्लाझ्मा कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या शरीरात घातल्या जातात. ज्यामुळे रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार होतात. कोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी जगातील इतर अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरिया, इटली, तुर्की आणि चीनसह अनेक देशांमध्ये याचा वापर केला जात आहे.