Suspended MPs Name Of Opposition: सभागृहात अडथळा आणलेप्रकरणी विरोधी पक्षांतील 15 खासदार संसदेतून निलंबीत, पाहा यादी
त्यावरुन विरोधी पक्षातील 15 सदस्यांना (खासदार) सभागृहातून निलंबीत करण्यात आले आहे. केंद्र सरकारने केलेल्या कारवाईमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
Lok Sabha MPs Suspended: संसद सुरक्षा भंग (Parliament Security Breach) प्रकरणी गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावे या मागणीसाठी विरोधी पक्षाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आग्रह धरला. सरकार मागणीला जुमानत नसल्याचे पाहून विरोधकांनी सभागृहातील कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन विरोधी पक्षातील 15 सदस्यांना (खासदार) सभागृहातून निलंबीत करण्यात आले आहे. केंद्र सरकारने केलेल्या कारवाईमुळे अनेकांना धक्का बसला आहे. या निर्णयाची देशभर चर्चा सुरु आहे. सभागृहातून निलंबीत करण्यात आलेल्या खासदारांची नावे खालील प्रमाणे-
निलंबनाचा तपशील:
निलंबित 15 खासदारांपैकी नऊ काँग्रेसचे, दोन सीपीएम, एक सीपीआय आणि दोन द्रमुकचे आहेत. प्रमुख नावांमध्ये काँग्रेस खासदार मणिकम टागोर, मोहम्मद जावेद, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, डीएमके खासदार के कनिमोझी आणि एसआर पार्थिबन, सीपीएम खासदार पीआर नटराजन आणि एस वेंकटेशन आणि सीपीआय खासदार के सुब्बारायन यांचा समावेश आहे.
काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा ठराव
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आदल्या दिवशी एक ठराव मांडला. ज्यामध्ये काँग्रेस खासदार - टीएन प्रतापन, हिबी इडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे - या पाच खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा अशी मागणी करण्यात आली होती. निलंबनामागे गैरवर्तन आणि अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा तहकूब:
दरम्यान, लोकसभेत घडलेल्या सुरक्षा भंगानंतर लोकसभेचे कामकाज दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सुरक्षा भंगानंतर वाढलेल्या तणावादरम्यान खासदारांचे निलंबन झाले, आज संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
सुरक्षा उल्लंघन तपशील:
संसदेच्या सभागृहात शून्य प्रहल सुरु असताना दोन व्यक्तींनी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेत उडी मारली. धुराचे नळकांडे सोडले. या घटनेत किमान सहा जणांचा सहभाग होता, अशी माहिती पुढे येत आहे. 2001 च्या जुन्या संसदेच्या इमारतीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापन दिनादिवशीच ही घटना घडली. त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
तपास आणि कडक सुरक्षा:
लोकसभा आणि संसद आवारात धूर केलेप्ररणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी उल्लंघनाची चौकशी करत आहेत आणि लोकसभेच्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्या कार्यालयाच्या विनंतीवरून घुसखोरांना अभ्यागतांचे पास जारी करण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या चौकशीची मागणी केली आहे.