Online Rummy: महिलेने 'ऑनलाइन रम्मी'मध्ये गमावले लाखो रुपये; कर्जाचा बोझा सहन न झाल्याने केली आत्महत्या
तिने हे पैसेदेखील खेळात गमावले. अशाप्रकारे कर्जाचा बोजा वाढल्याने ती नैराश्यात राहू लागली होती
सध्या ऑनलाइन रमी (Online Rummy), पोकर किंवा जुगार खेळण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जिथे युजर्स ऑनलाइन जुगार खेळतात. अशा कंपन्यांच्या जाहिराती टीव्हीवरही दिसू लागल्या आहेत. परंतु ऑनलाइन जुगारामुळे तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. ताजे प्रकरण चेन्नईचे (Chennai) आहे, जिथे एका विवाहित महिलेने ऑनलाईन जुगारात लाखो रुपये गमावले व शेवटी कर्जाचा बोझा सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. महिलेने ऑनलाइन रमीमध्ये साडेसात लाख रुपयांचे सोने आणि तीन लाख रुपयांची रोकड गमावली होती.
काही लोकांना असे वाटते की ऑनलाईन जुगार हा घरी बसून पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आहे, परंतु त्यात बरेच धोके देखील आहेत. जुगारात प्रत्येक वेळी जिंकणे शक्य नसते. पराभूत झाल्यावर, पुढच्या वेळी कदाचित आपला विजय होईल या आशेने खेळाडू खेळत राहतात. चेन्नईमधील एका विवाहित महिलेलादेखील असेच वाटले व ती ऑनलाइन रमी खेळत राहिली. यामध्ये तिने साधारण साडेदहा लाख रुपये गमावले. हे पैसे तिने तिच्या बहिणींकडून उसने घेतले होते. या कर्जामुळे तिने शेवटी आत्महत्या केली.
भवानी असे या 29 वर्षीय महिलेचे नाव आहे. ती मनाली न्यू टाऊनमध्ये राहत होती. तिचे बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले होते. 2016 मध्ये तिचे बकियाराजसोबत लग्न झाले होते. दोघांना 3 आणि 1 वर्षाची दोन मुले आहेत. पती बकियाराज एका खासगी कंपनीत काम करतो, तर भवानीदेखील कंडचवाडी येथील एका खासगी आरोग्य कंपनीत काम करत होती. टाइम्स ऑफ इंडियाने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भवानीने कोरोना लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन जुगार खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिने थोडे पैसे गुंतवले आणि नफा कमावला. नंतर तिला याचे व्यसन लागले.
झटपट येत असलेला पैसा पाहून तिने ऑनलाइन रम्मीमध्ये अधिक पैसे गुंतवायला सुरुवात केली. मात्र हळूहळू ती खेळात हरत गेली व त्यात तिने लाखो रुपये गमावले. घरच्यांनी आणि नातेवाईकांनी तिला अडवल्यावरही ती चोरून ऑनलाइन रमी खेळत राहिली. तिला आशा होती की एक दिवस ती मोठी रक्कम जिंकेल. (हेही वाचा: पबजी गेमचे व्यसन, 16 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडत केली आईची हत्या)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या दोन बहिणींकडून 3 लाख रुपये उसने घेतले होते. तिने हे पैसेदेखील खेळात गमावले. अशाप्रकारे कर्जाचा बोजा वाढल्याने ती नैराश्यात राहू लागली होती. रविवारी रात्री तिने कुटुंबासाठी जेवण बनवले. त्यानंतर सकाळी 8.30 च्या सुमारास अंघोळ करायला म्हणून ती बाथरूममध्ये गेली मात्र परत जिवंत बाहेर आलीच नाही. तिने बाथरूममध्ये फाशी लावून घेतली होती.