Online Marriage: तुर्की बॉसने भारतीय पुरुषाला लग्नाची रजा नाकारली; व्हिडिओ कॉलवर पार पडला हिमाचल प्रदेशमधील वधूशी निकाह

त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती, पण लग्नाच्या ठरलेल्या तारखेपर्यंत अदनानला सुट्टी मिळाली नाही आणि तो आपल्या देशात परत जाऊ शकला नाही.

Marriage (PC - Pixabay)

सध्याचे युग प्रत्येक क्षणी नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान घेऊन येत असून लोक त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. अशा परिस्थितीत अनेक वेळा तंत्रज्ञानासंबंधी अशी प्रकरणे समोर येतात, जी सर्वांनाच चकित करतात. असेच एक प्रकरण हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) समोर आले आहे. जिथे दोन वेगवेगळ्या देशात बसलेल्या लोकांमधील अंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी झाले. प्रकरण मंडी जिल्ह्याचे आहे, जिथे एका वधूने परदेशात काम करणाऱ्या तिच्या वराशी ऑनलाइन लग्न (Online Marriage) केले. अहवालानुसार, मंडी जिल्ह्यातील सुंदरनगरच्या दुगराई गावातील फहरीन या मुलीचे लग्न बिलासपूर येथील अदनानसोबत निश्चित झाले होते.

अदनान तुर्कियेमध्ये काम करतो. त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती, पण लग्नाच्या ठरलेल्या तारखेपर्यंत अदनानला सुट्टी मिळाली नाही आणि तो आपल्या देशात परत जाऊ शकला नाही. त्यानंतर मंडीतील वधूच्या कुटुंबीयांनी बिलासपूरमधील वराच्या कुटुंबीयांशी बोलणी केली आणि 3 नोव्हेंबरला दोघांनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलद्वारे लग्न केले.

वधूचे आजोबा बशीर मोहम्मद म्हणाले, ‘माझ्या नातीचे लग्न तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या बिलासपूर येथील अदनानसोबत निश्चित झाले होते. लग्नाच्या तारखेला अदनानला सुट्टी मिळाली नव्हती, पण त्याच दिवशी लग्न पार पडले. यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला. व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलचा आधार घेतला आणि वधू-वरांनी इस्लामिक पद्धतीने लग्न स्वीकारले.’ वधूच्या आजारी आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर लग्न व्हावे यासाठी कुटुंबीयांनी हा शॉर्टकट शोधला होता. (हेही वाचा: India Wedding Season: येत्या दोन महिन्यांत भारतात 48 लाख विवाह होण्याची अपेक्षा; व्यवसायात होऊ शकते 6 लाख कोटींची कमाई- CAIT)

रविवारी अदनानचे कुटुंब वऱ्हाड घेऊन बिलासपूरवरून मंडीला गेले. त्यानंतर सोमवारी व्हिडिओ कॉलवर लग्न झाले. या ठिकाणी काझींच्या उपस्थितीत जोडप्याने लग्न मान्य केले. दरम्यान, लग्नासारख्या महत्त्वाच्या कौटुंबिक समारंभात तंत्रज्ञानाने भूमिका बजावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जुलै 2023 मध्ये एका जोडप्याने भूस्खलन आणि पुरामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.