Ola to Shut Global Operations: राइड-हेलिंग कंपनी ओला परदेशातील आपली सेवा बंद करणार; भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला मोठा निर्णय
बाईक-टॅक्सी सेवा देण्यासाठी कंपनीने ओला इलेक्ट्रिककडून 8,000 इलेक्ट्रिक स्कूटर घेतल्या आहेत.
Ola to Shut Global Operations: कॅब सेवा कंपनी (Cab Service Company) ओला (Ola) परदेशात आपले कामकाज बंद करणार आहे. कंपनीने सांगितले की, एप्रिलच्या अखेरीस ते न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम (यूके) मध्ये आपला व्यवसाय बंद करणार आहेत. कंपनीने आपल्या युजर्सना नोटीफिकेशन्स पाठवणे बंद केले आहे. ऑस्ट्रेलियातील कंपनीची सेवा 12 एप्रिलपासून बंद होणार आहे. कंपनीने 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आपली सेवा सुरू केली होती.
कंपनीच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आणि सांगितले की, गतिशीलतेचे भविष्य इलेक्ट्रिक आहे. भारतात केवळ वैयक्तिक गतिशीलतेमध्येच नव्हे तर कॅब सेवा व्यवसायातही विस्ताराला भरपूर वाव आहे. हे ध्येय लक्षात घेऊन कंपनीने आपल्या प्राधान्यक्रमांचा आढावा घेतला आहे आणि परदेशात आपली कॅब सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ कंपनी आता परदेशाऐवजी केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार आहे.
जानेवारीमध्ये, ओला कॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांनी सांगितले होते की, कंपनी आपला फ्लीट इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेवांवर लक्ष केंद्रित करेल. बाईक-टॅक्सी सेवा देण्यासाठी कंपनीने ओला इलेक्ट्रिककडून 8,000 इलेक्ट्रिक स्कूटर घेतल्या आहेत. ओला कॅब्स 2010 मध्ये सुरू झाली होती आणि आज ती देशातील सर्वात मोठी कॅब सेवा देणारी कंपनी बनली आहे. अंकित भाटी आणि भाविश अग्रवाल यांनी ही कंपनी सुरू केली होती. (हेही वाचा: 30 Indian Startups Raised Over $172 Million: 30 भारतीय स्टार्टअप्सनी $172 दशलक्षपेक्षा जास्त उभारला निधी)
दरम्यान, कॅब सेवा पुरवठादार ओला आणि उबेरने ऑटो-रिक्षा चालकांसाठी प्रत्येक राइडवर कमिशन आकारण्याऐवजी सबस्क्रिप्शन-आधारित योजना आणली आहे. ओलाने हे मॉडेल दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादसह काही मोठ्या शहरांमध्ये लॉन्च केले आहे, तर उबरने चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमसह 6 शहरांमध्ये हे मॉडेल लॉन्च केले आहे. या उपक्रमाचा फायदा ऑटोचालकांना होणार आहे.