Noida Call Centre: नोएडा येथून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, कॉल सेंटरमधून 84 जणांना अटक

या सर्वांवर फसवणुकीचा आरोप आहे. तसेच आरोपींकडे सुमारे पाच लाख अमेरिकन नागरिकांचा डेटाबेस होता ज्यात त्यांची नावे, संपर्क क्रमांक आणि काही आर्थिक तपशीलांचा समावेश होता.

Arrested | (File Image)

Noida Police: अमेरिकन सरकारी अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना (Duping US citizens) कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका रॅकेटचा नोए़ा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट नोएडा येथून कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरु होते. पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकून केलेल्या कारवाईत 36 महिलांसह 84 जणांना अटक केली आहे. या सर्वांवर फसवणुकीचा आरोप आहे. तसेच आरोपींकडे सुमारे पाच लाख अमेरिकन नागरिकांचा डेटाबेस होता ज्यात त्यांची नावे, संपर्क क्रमांक आणि काही आर्थिक तपशीलांचा समावेश होता. ज्याचा वापर त्यांना फसवणुकीच्या दृष्टीने लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना विश्वासात घेण्यासाठी केला गेला होता, असे नोएडा पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे.

नोएडा पोलिसांनी प्राप्त माहिती आणि संशयाच्या आधारे बुधवारी सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास कॉल सेंटरवर छापा टाकला. जे नोएडा येथील सेक्टर 6 मध्ये सुरु होते. या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी काहीतरी संशयास्पद कामे केली जातात, अशा तक्रारी आल्या होत्या. तसेच, पोलिसांनाही संशय होता. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली असे पोलीस उपायुक्त (नोएडा) हरीश चंदर यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले हे एक मोठे कॉल सेंटर आहे. जेथून आम्ही 84 जणांना अटक केली. हे सर्वजण रात्रपाळीत काम करत होते.

संशयास्पद बाब अशी की हे कॉलसेंटर आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळीच वापरले जायचे. एरवी ते बंदच असे. मात्र, रात्रीच्या वेळी हे आरोपी बहुसंख्येने एकत्र येत आणि अमेरिकी नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत. ही टोळी एका रात्रीत जवळपास 25 चे 30 लाख रुपये कमावत असे. पाठिमागील चार महिन्यांपाकून हे सेंटर कार्यरत होते, अशी पोलिसांची माहिती आहे. प्रकरणाचा तपास अजूनही सुरुच आहे. दरम्यान,या कॉल सेंटरमागील सूत्रधार मानल्या जाणार्‍या दोन प्रमुख व्यक्तींची ओळख पटली आहे. परंतु ते फरार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, कॉलसेंटरच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी अमेरिकन दूतावासालाही याबाबत माहिती दिली गेली आहे. तर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि इंटरपोल यांच्याशी औपचारिक संवाद साधला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.