Bandra- Worli Sea link वर नितीन गडकरी यांना सुद्धा भरावा लागला होता दंड, मोदी सरकारच्या 100 दिवसपूर्ती कार्यक्रमात सांगितला किस्सा
यावेळी एक खास किस्सा सांगताना वांद्रे-वरळी सी लिंक वरून प्रवास करत असताना वाहनाचा वेग वाढल्याने आपल्याला सुद्धा मोठा दंड भरावा लागला होता असे गडकरी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर 100दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने मुंबईत एक खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. सध्या देशभरात मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) दुरुस्ती अंतर्गत आकारण्यात येणारा मोठा दंड हा बहुचर्चित विषय आहे. याच चर्चांना जोडून बोलत असताना आज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कार्यक्रमात एक खास किस्सा शेअर केला. एकदा वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra- Worli Sea link) वरून प्रवास करत असताना वाहनाचा वेग वाढल्याने आपल्याला सुद्धा मोठा दंड भरावा लागला होता असे गडकरी यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जनरल व्ही. के. सिंग (V. K. Singh) यांनाही वेगात गाडी चालवली म्हणून दंड भरावा लागला आहे”, अशीही आठवण गडकरींनी सांगितली. (मोदी सरकार 2.0 चे 100 दिवस; पीएम नरेंद्र मोदी यांनी घेतले अनेक धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय, बदलला देशाचा भूगोल आणि लोकांचे भविष्य)
खरंतर देशभरात मोटार वाहन कायद्यातील दुरूस्तीवरून अनेक चर्चा सुरु आहेत. दंडाची रक्कम ही सामान्य माणसाला लुबाडण्याचा हेतूने बनवण्यात आली आहे असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र यावर उत्तर देत गडकरी यांनी हा नवा नियम भेदभाव करणारा नाही सामान्य- श्रीमंत अशा कोणालाही नियमभंग केल्यास दंड भरावाच लागेल. यावर उपाय म्हणजे तुम्ही नियमन तोडू नका असे ते म्हणले. याचप्रमाणे हा कायदा मंजूर करणे केंद्र सरकारसाठी मोठी कामगिरीच आहे. वाहतूक नियमांचा भंग केला म्हणून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवल्याने पारदर्शकता वाढेल. भ्रष्टाचार होणार नाही”, असे गडकरी यांनी सांगितले. (Motor Vehicles Act: ओडिशाच्या ट्रक चालकास आकाराला देशातील सर्वाधिक दंड; जाणून घ्या मोडलेले नियम आणि दंडाची रक्कम)
दरम्यान, मोटार वाहन कायदा दुरुस्ती अंतर्गतकेंद्र सरकारने वाहतूक दंडांच्या रकमेत जबर वाढ केली आहे. कार चालवताना सीट-बेल्ट लावला नाही किंवा बाईकवर हेल्मेट घातले नसल्यास 1000 रुपये दंड, अतिवेगाने गाडी चालवली तर 5000 रुपये दंड करण्यात आला आहे . इतकेच काय तर पायात स्लीपर्स घालून किंवा लुंगी नेसून वाहन चालवल्यास 2000 पासून पुढे दंड आकारण्यात येणार आहे. हा कायदा लागू होताच मुंबई, ओडिशा, लखनौ, दिल्ली अशा अनेक ठिकाणहून मोठे दंड आकारण्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत.