Nirbhaya Rape Case: निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना 3 मार्च ला होणार फाशी; पटियाला न्यायालयाने जारी केले नवे डेथ वॉरंट
पटियाला न्यायालायने जारी केलेल्या नव्या डेथ वॉरंट नुसार येत्या ३ मार्च ला सकाळी ६ वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील चारही दोषींच्या प्रलंबित फाशीची अंतिम तारीख आता ठरवण्यात आली आहे. पटियाला न्यायालायने जारी केलेल्या नव्या डेथ वॉरंट नुसार येत्या 3 मार्च ला सकाळी 6 वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी, विनय (Vinay), पवन (Pawan) , मुकेश (Mukesh), अक्षय (Akshay) यांनी मागील महिन्याभरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे दया याचिका करत आपली फाशी माफ करून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या सर्व याचिका फेटाळून लावण्यात आल्या, असं असलं तरीही या याचिकांसाठी बराच वेळ गेल्याने ही फाशी लांबणीवर पडली होती.
पटियाला कोर्टाकडून हे नवे डेथ वॉरंट येताच निर्भयाची आई आशा देवी (Asha Devi) यांनी प्रतिक्रिया देत आपण या निर्णयाने काही फार आनंदी नसल्याचे म्हंटले आहे. यापूर्वी तीन वेळेस सुद्धा फाशी देण्याचे ठरले होते, मात्र तरीही आम्ही आतापर्यंत लढत होतो. आता तरी 3 मार्च ला फाशी होईल अशी आशा निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.
ANI ट्विट
दरम्यान, निर्भया घटनेला आता 7 वर्षाचा काळ लोटून गेला आहे , या चारही दोषींचे आरोप सिद्ध होऊनही बरेच दिवस झालेत त्यामुळे त्यांना विनाकारण पोसण्यात काहीही अर्थ नाही अश्या मागणीसह देशभरातून या प्रकरणात अनेक तीव्र प्रतिक्रया समोर येत होत्या, या वर्षाच्या सुरुवातीलाच या प्रकरणी आशादायी वृत्त समोर येऊन 22 जानेवारी रोजी निर्भयाच्या सर्व दोषींना फाशी देण्यात येईल असे सांगण्यात आले होते, मात्र त्यांनतर दया याचिका, फेरविचार याचिका व अन्य सर्व पळकुट्या मार्गानी या दोषींनी फाशी चुकवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. अखेरीस 22 जानेवारीच्या फाशी लांबणीवर पडत 1 फेब्रुवारी हा दिवस ठरवण्यात आला होता, पण त्यावेळी सुद्धा अशाच कारणांनी फाशीवर स्थगिती आणण्यात आली. आता मात्र अखेरीस पटियाला कोर्टाकडून याप्रकरणी अंतिम निर्णय आला असून 3 मार्च रोजी निर्भयाच्या चारही दोषींना मृत्यदंडाची शिक्षा मिळण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.