Delhi: पंचतारांकित Leela Palace Hotel मध्ये 4 महिने थांबल्यानंतर लाखोंचे बिल चुकवून व्यक्ती फरार; UAE रॉयल फॅमिली स्टाफ असल्याचे सांगून केली फसवणूक

यानंतर तो कोणालाही न सांगता निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीकडे हॉटेलचे सुमारे 23 लाख रुपयांचे बिल थकले होते.

Leela Palace Hotel (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपण फसवणुकीच्या, चोरीच्या अनेक घटना पहिल्या असतील, आता राजधानी दिल्लीमध्येही (Delhi) फसवणुकीचे असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये (Leela Palace Hotel) चार महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर एक व्यक्ती बिल न भरताच फरार झाला आहे. या व्यक्तीने स्वत:ला यूएईच्या राजघराण्यातील कर्मचारी असल्याचे सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा एकूण खर्च सुमारे 23-24 लाख रुपये झाला आहे. हे बिल न भारताच तो पळून गेला आहे.

दिल्ली पोलिसांनी फरार व्यक्तीची ओळख मोहम्मद शरीफ अशी केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शनिवारी शरीफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद शरीफ गेल्या वर्षी 1 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या कालावधीत पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता. यानंतर तो कोणालाही न सांगता निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीकडे हॉटेलचे सुमारे 23 लाख रुपयांचे बिल थकले होते. आरोपीविरुद्धच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने हॉटेलच्या खोलीतून चांदीची भांडी आणि इतर वस्तू देखील चोरल्या आहेत. सुरुवातीला, त्याने अधिकाऱ्यांना सांगितले की तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतो आणि अबू धाबीच्या राजघराण्याचे सदस्य शेख फलाह बिन झायेद अल नाह्यान यांच्या कार्यालयात काम करतो. (हेही वाचा: भारतामधील आर्थिक असमानतेमध्ये वाढ; देशातील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांकडे 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती- Oxfam)

आरोपी शरीफने हॉटेलच्या कर्मचार्‍यांना सांगितहोते ले की तो शेख यांच्यासोबत वैयक्तिकरित्या काम करतो आणि काही अधिकृत कामासाठी भारतात आला आहे. यानंतर तो हॉटेलमधील रूम नंबर 427 मध्ये थांबला. चेक-इनसाठी मोहम्मद शरीफ याने यूएईचे रहिवासी कार्ड, बिझनेस कार्डसह इतर काही कागदपत्रेही दिली होती. आता चौकशीत ही कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, आरोपीने हॉटेलमध्ये राहण्यासाठी सुमारे 11.5 लाख रुपये दिले होते. मात्र, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बिलाची बहुतांश रक्कम न भरताच तो निघून गेला.