केंद्रीय अर्थसंकल्पामुळे पहिल्यांदाच 'या' दिवशीही सुरु राहणार शेअर बाजार

मुंबईच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडणार आहे.

शेअर बाजार (Photo Credits: PTI)

येत्या 1 फेब्रुवारी ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा 1 फेब्रुवारीला शनिवार आला असला तरीही अर्थसंकल्पामुळे मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. मुंबईच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडणार आहे. कारण मुंबई शेअर बाजार (Mumbai Share Market) हे केवळ सोमवार ते शुक्रवारच सुरु असते. यासंदर्भात मुंबई शेअर बाजाराने त्यासंदर्भाचे पत्रकही जारी केले आहे. मात्र यंदा आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार सुरु राहणार असल्यामुळे लोकांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

साधारणपणे काही मोजक्या राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज चालू असते. मात्र यंदा 1 फेब्रुवारीला शनिवार आला असला तरी बजेटमुळे मुंबई शेअर बाजार सुरु राहणार आहे.

यापूर्वी 2015 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र 28 फेब्रुवारी रोजी शनिवार असल्याने शेअर बाजार बंद होता. केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वांसाठीच महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण या दिवशी तमाम गृहिणींचे बजेट अवलंबून असणार आहे. त्यामुळे सरकाकडून काय नवीन घोषणा करण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जाहीर करणार अर्थसंकल्प

येत्या 1 फेब्रुवारी रोजी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. त्या दिवशी मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 या वेळेत शेअर ट्रेडिंग होईल, असे 'बीएसई' ने म्हटलं आहे. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) अद्याप यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र सरकारपुढे देशाची अर्थव्यवस्था सुरळीत कशी करावी हे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ब्रीफकेसची परंपरा बदलली आहे. तर आज अर्थसंकल्पाची कॉपी ही लाल सुटकेट ऐवजी लाल कपड्यात ठेवण्यात आल्याचे दिसून आले.