Mumbai MLA Report Card: मुंबईमधील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जारी; कॉंग्रेसचे Amin Patel हे 82.92% गुणांसह अव्वल, जाणून घ्या संपूर्ण यादी
अलीकडेच, संस्थेने आपले 12 वे मुंबई आमदार अहवाल कार्ड जारी केले, ज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 ते अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 पर्यंत आमदारांच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन केले गेले.
Mumbai MLA Report Card: ताज्या एमएलए रिपोर्ट कार्डमध्ये (MLA Report Card) अमीन पटेल (Amin Patel) हे सलग तिसऱ्या वर्षी मुंबईतील सर्वोच्च कामगिरी करणारे विधानसभेचे सदस्य (आमदार) ठरले आहेत. ते 82.92% गुणांसह या यादीमध्ये अव्वल ठरले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजा फाउंडेशनने आमदार रिपोर्ट कार्ड जारी केले आहे, ज्यामध्ये ही बाब समोर आली. दुसरीकडे, नवाब मलिक केवळ 18% गुणांसह सर्वात खालच्या स्थानावर आहेत. आमदार रिपोर्ट कार्डद्वारे दिसून येते की, 14 व्या विधानसभेने केवळ 119 दिवस काम केले, जे 12 व्या विधानसभेच्या 210 कामकाजाच्या दिवसांपेक्षा 43% कमी आहे.
आपल्या विस्तृत उपक्रमांद्वारे उत्तरदायी प्रशासन सक्षम करण्यासाठी कार्य करत असलेले प्रजा फाऊंडेशन, एक दशकाहून अधिक काळ आमदार, नगरसेवक आणि नोकरशहा यांच्यासाठी रिपोर्ट कार्ड जारी करत आहे.
अलीकडेच, संस्थेने आपले 12 वे मुंबई आमदार अहवाल कार्ड जारी केले, ज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 ते अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 पर्यंत आमदारांच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन केले गेले. अहवाल कार्डामध्ये विधानसभेत किमान तीन वर्षे सेवा केलेल्या आमदारांच्या एकत्रित कामगिरीचे तसेच 14 व्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या एकूण उत्पादकतेचेही मूल्यांकन केले गेले. अहवालानुसार, आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या 12 व्या विधानसभेतील 40,512 वरून 14 व्या विधानसभेत 11,132 पर्यंत 73% ने कमी झाली. मात्र, विधानसभा अधिवेशनात आमदारांची उपस्थिती सरासरी 89 टक्के होती.
रिपोर्ट कार्डनुसार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबादेवी मतदारसंघातील अमीन पटेल यांना विधानसभेतील उपस्थिती तसेच, त्यांच्या स्वच्छ गुन्हेगारी रेकॉर्डसाठी प्रथम क्रमांक मिळाला, तर विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि त्या प्रश्नांच्या गुणवत्तेसाठी त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला. 2024 मध्ये एकूण 34 आमदारांपैकी 80% पेक्षा जास्त गुण मिळवणारे पटेल हे एकमेव आमदार आहेत. (हेही वाचा; Sanjay Raut: 'सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली'; संजय राऊतांचे महायुती सरकारवर टीकास्त्र)
या यादीमध्ये दिंडोशी मतदारसंघातील शिवसेनेचे (UBT) सुनील वामन प्रभू 78.71% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड 76.51% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वोच्च पदावर असलेल्या आमदारांमध्ये दहिसर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चौधरी आणि मालाड मतदारसंघातील काँग्रेसचे अस्लम शेख यांचाही यादीत समावेश आहे.
पाच सर्वात खालच्या रँकिंग आमदारांमध्ये अणुशक्ती नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक 18 टक्के गुण, माहीममधून शिवसेनेचे सदानंद सरवणकर 27.27 टक्के, मागाठाणे येथील शिवसेनेचे प्रकाश सुर्वे 29.82 टक्के, चांदिवलीतून शिवसेनेचे दिलीप लांडे 31.26 टक्के आणि घाटकोपरमधून भाजपचे रामचंद्र कदम 33.07% टक्के, यांचा समवेश आहे. आमदारांच्या कामगिरीवर आधारित राजकीय पक्षांच्या कामगिरीच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, काँग्रेस 72.56% सह प्रथम क्रमांकावर आहे, तर भाजप 60.08% सह दुसऱ्या स्थानावर आहे.