Mumbai Metro 2A Ridership: मुंबई मेट्रो 2A ची रायडरशिप नियोजित संख्येपेक्षा तब्बल 55% कमी; केवळ 35,88,870 सरासरी मासिक प्रवासी
परंतु या वर्षी जानेवारीपासून रायडरशिप कमी होऊ लागली आणि मार्च 2024 मध्ये ती मासिक 37,78,556 होती.
Mumbai Metro 2A Ridership: मोठ्या प्रतीक्षेनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मेट्रो सेवा सुरु झाली. मात्र जसा पहिल्या लाईनला प्रतिसाद मिळाला, तसा इतर लाईन्सना मिळत नसल्याचे दिसत आहे. अहवालानुसार, 2023 च्या तुलनेत मुंबई मेट्रो 2A (दहिसर- डी एन नगर) या मार्गावरील मासिक प्रवासी संख्या (Monthly Ridership) यंदा कमी होत आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स लिमिटेड (MMMOL) द्वारे प्रदान केलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब समोर आली आहे.
माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत, कार्यकर्ते झोरू भाथेना यांनी एमएमएमओएलला ‘अपेक्षित रायडरशिप आणि वास्तविक मासिक रायडरशिप’ बद्दल डेटा विचारला होता. त्यावर एमएमएमओएलने आपल्या उत्तरात सांगितले की, 'अपेक्षित रायडरशिप उपलब्ध नाही' आणि त्यांनी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मेट्रो 2A मार्गासाठी वास्तविक मासिक रायडरशिप डेटा प्रदान केला. आकडेवारीनुसार, दहिसर-डी एन नगर (अंधेरी पश्चिम) वर सरासरी मासिक रायडरशिप 35,88,870 आहे.
याबाबत भथेना म्हणाले, ‘जरी प्राधिकरणाने मासिक प्रवाशांची अपेक्षित संख्या प्रदान केली नसली तरी, त्यांच्या तपशीलवार प्रकल्प अहवालात (DPR) स्पष्टपणे नमूद केले आहे की मेट्रो 2A च्या पहिल्या वर्षासाठी दररोज 2.7 लाख प्रवासी नियोजित होते. म्हणजेच मासिक 81 लाखांपर्यंत प्रवासी. मात्र आता सरासरी मासिक रायडरशिप सुमारे 36 लाख आहे, म्हणजेच ती अपेक्षित प्रवाशी संख्येपेक्षा 55 टक्के कमी आहे.’ (हेही वाचा; Ahmedabad-Mumbai Central Vande Bharat: अहमदाबाद-मुंबई सेंट्रल मार्गावर 20-कोच वंदे भारतची, 130 किमी प्रतितास वेगाची चाचणी यशस्वी; प्रवास वेळ 5 तास 21 मिनिटे)
भथेना यांनी पुढे नमूद केले की, ‘या वर्षी केवळ मासिक प्रवासी संख्याच कमी झाली नाही, तर एकूणच, दहिसर-डी एन नगर मार्गासाठी वापरही कमी झाला आहे. कार्यालयात जाणाऱ्यांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे, मात्र तरी अपेक्षेप्रमाणे या मार्गाचा वापर का होत नाही? हे समजणे गरजेचे आहे.’ दहिसर ते डी एन नगर (अंधेरी) ला जोडणाऱ्या 18.6 किमी लांबीच्या मेट्रो 2A चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2023 मध्ये करण्यात आले.