Mosque in Ayodhya: मक्केतील इमाम करणार अयोध्येतील मशिदीची पायाभरणी; ताजमहालपेक्षाही सुंदर असेल वास्तू, जगातील सर्वात मोठे कुराण ठेवले जाणार
प्रत्येक धर्माच्या लोकांना येथे येण्याची परवानगी असेल. रामजन्मभूमी वादावर आपला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला मशिदी बांधण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश दिले होते.
अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन होणार आहे. अशात अयोध्येत मशिदीचीही (Mosque) पायाभरणी केली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. या ठिकाणी रमजानपूर्वी मशिदीचा पाया रचला जाईल व येथे पहिली नमाज मक्काचे इमाम अब्दुल रहमान अल सुदाईस अदा करतील, असे अहवाल समोर आले आहेत. भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी शुक्रवारी दैनिक भास्करला ही माहिती दिली. हाजी अराफत शेख यांना मशीद विकास समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या नावावरून या मशिदीचे नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अराफत शेख म्हणाले की, अयोध्येपासून सुमारे 25 किमी अंतरावर बांधण्यात येणारी मशीद भारतातील सर्वात मोठी मशीद असेल. 21 फूट उंच आणि 36 फूट रुंद असे जगातील सर्वात मोठे कुराण त्यात ठेवण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले, सरकारने 5 एकर जमीन दिली होती, त्यात आणखी काही जमीन खरेदी केली आहे. अशाप्रकारे एकूण 11 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
मशिदीच्या आवारात कॅन्सर हॉस्पिटल बांधले जाईल, जिथे प्रत्येक धर्म आणि पंथाच्या लोकांना मोफत उपचार दिले जातील. त्यामुळे देशात प्रेमाचा संदेश जाईल. या ठिकाणी शाळा, संग्रहालय आणि वाचनालयही बांधले जाईल. परिसरात इंजिनीअरिंग, मेडिकल, डेंटल अशी पाच महाविद्यालये बांधली जाणार आहेत. दुबईपेक्षाही मोठे मत्स्यालय येथे उभारले जाणार आहे.
अराफत शेख म्हणाले की, फेब्रुवारीनंतरचे चांगला दिवस पाहून आमचे पीर रमजानच्या आधी मशिदीची पायाभरणी करतील. त्यासाठी मुंबईहून विटा पाठवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पाच-सहा वर्षात तयार होईल, तेव्हा आम्ही इमाम-ए-हरामला तिथे पहिल्या नमाजसाठी बोलावू. मशीद बांधण्यासाठी सरकारकडून एक रुपयाही घेतलेला नाही. आम्ही आमची स्वतःची वेबसाइट तयार करत आहोत, ज्यामध्ये QR कोड असेल, ज्याद्वारे देणगी डेटा येईल. (हेही वाचा: Special Trains for Ayodhya Ram Mandir: राममंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 19 जानेवारीपासून चालवणार 1,000 स्पेशल गाड्या)
मशिदीची रचना ताजमहालपेक्षाही सुंदर दिसेल असे त्यांनी सांगितले. मशिदीत मोठमोठे कारंजे लावण्यात येणार असून, ते सायंकाळी सुरू होतील. प्रत्येक धर्माच्या लोकांना येथे येण्याची परवानगी असेल. रामजन्मभूमी वादावर आपला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला मशिदी बांधण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतील रौनाही येथील धन्नीपूर गावात मशिदीसाठी 5 एकर जमीन दिली होती. ऑक्टोबरमध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाची बैठक झाली, ज्यामध्ये धन्नीपूर गावातील मशिदीच्या लेआउटला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मशिदीचा लेआउट सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला दाखवण्यात आला.